पवई तलाव सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प गुंडाळला; पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतर पालिकेचा निर्णय

cवई तलावात विविध वाहिन्यांच्या माध्यमातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी छोटा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र हा प्रकल्प बसवण्याचा खर्च करण्याऐवजी, तलावात सांडपाणी सोडण्यात येवू नये अशी मागणी पॉज या पर्यावरणवादी संघटनेने लावून धरली होती. याबाबत आवर्तन पवईने पाठपुरावा केला होता. महानगर पालिकेने अखेर आपला हा निर्णय पाठीमागे घेत, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी दुसरे उपाय योजणार असल्याचे ‘पॉज’ या पर्यावरणवादी संघटनेला लेखी पत्राद्वारे कळवले आहे.

पवई तलावात गटाराचे पाणी सोडल्याने तलावात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले आहे. परिसरातून जाताना उग्र वास तर येतोच सोबतच येथील जैवविविधता सुद्धा धोक्यात आली आहे. तलावात असणाऱ्या मगरींच्या जीवाला असणारा धोका पाहता याबाबत पर्यावरणवादी संघटनेनी तलावात सोडले जाणारे गटाराचे आणि दुषित पाणी त्वरित बंद करण्याची मागणी केली होती.

या समस्येवर उपाय म्हणून पालिकेने सांडपाणी वाहून आणणाऱ्या वाहिन्यांच्या मुखाशी छोटे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे करून हे पाणी तलावात सोडण्याचा घाट घातला होता. मात्र, तलावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बसवणे योग्य नसून, असे प्रकल्प बसवण्यात येऊ नयेत अशी मागणी ‘पॉज’ या पर्यावरणवादी संस्थेने केले होते. याबाबत आवर्तन पवईने सतत पाठपुरावा केला होता. अखेर संस्थेच्या या मागणीला मान्य करत पालिकेने आपला हा प्रकल्प गुंडाळला आहे.

“गेल्या आठवड्यात पालिकेतर्फे आम्हाला एक पत्र मिळाले असून, आमची मागणी मान्य करत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पा ऐवजी येथे इतर उपाययोजना करण्यात येणार आहेत, त्याची यादी आम्हाला पाठवली आहे. ज्यानुसार तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मगरविहार, छोटेखानी पक्षी व फुलपाखरू संवर्धन केंद्र, हरित उद्यान, पदपथ व पथदिवे, म्युझिकल लेझर शो, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यासारख्या विकासकामांचा यादीत समावेश आहे. यासाठी ‘फ्रिश्चमन प्रभू’ या सल्लागार कंपनीला विकास आराखडा तयार करण्याचे काम सोपवले असून, सविस्तर आराखडा आल्यावर या कामांना सुरुवात होणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना ‘पॉज’ संस्थेचे सचिव सुनिश सुब्रामण्यम कुंजू यांनी सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!