पवई पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक (सपोनि) मधुकर पांडुरंग यादव यांना आज दुपारी ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. आरोपीला मदत करण्यासाठी त्यांनी पन्नास हजाराची लाच मागितली होती.
तक्रारदार हे पवईतील आयआयटी परिसरात राहतात. राहण्याच्या ठिकाणाच्या जागेवरून त्यांचे व त्यांच्या नातेवाईकामध्ये वादविवाद होता. ज्यावरून नातेवाईकाने पवई पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला होता. सपोनि यादव यांच्याकडे सदर गुन्हा वर्ग झाल्यानंतर आरोपीला अटक करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र तक्रारदार यांनी तत्पूर्वीच कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामीन मिळवला होता. ज्यानंतर त्यांनी त्याला बोलावून पुढे या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती.
“तक्रारदाराने याबाबत आमच्याकडे धाव घेतल्यानंतर केलेल्या पडताळणीत यादव यांनी पन्नास हजाराची लाच मागितल्याचे नक्की झाले होते; ज्यानंतर आम्ही सापळा रचून आज लाचेच्या रक्कम पैकी ५००० रुपयाची लाच स्विकारताना पवई पोलीस ठाणे परिसरातून त्यांना अटक केली.” असे याबाबत सांगताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.