रविराज शिंदे
पार्कसाईट येथील ४० वर्ष जुन्या सुभेदार रामजी मालोजी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकी पाठीमागे स्थानिक नगरसेवकाचा हे उद्यान हडपण्याचा डाव आहे, असा आरोप करीत स्थानिक व आंबेडकरी जनता उद्यान वाचवण्यासाठी या विरोधात एकवटली आहे. रविवारी १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून जनता याला विरोध दर्शवणार आहे.
पार्कसाईट येथे महानगरपालिकेचे ४० वर्ष जुने सुभेदार रामजी मालोजी उद्यान आहे. या उद्यानाची झालेली दुरवस्था पाहता, स्थानिक नागरिक व आंबेडकरी जनतेने याच्या डागडूजी आणि पुनर्विकासासाठी पालिकेकडे अर्ज सुद्धा दाखल केलेले आहेत, परंतु स्थानिक नगरसेवक हारून खान यांनी पालिकेकडून परवानगी मिळवत, याच उद्यानात पाण्याची टाकी उभारण्याची योजना आखल्याने जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे.
या उद्यानात पाण्याची टाकी उभारण्याच्या पाठीमागे नगरसेवकाचा उद्देश स्थानिक जनतेला पाणीपुरवठा करण्याचा नव्हे, तर कैलास कॉम्प्लेक्स येथील टॉवर बांधकामासाठी आणि येथील कार्यालयांना पाणीपुरवठा करण्याचा आहे. यासाठी ४० वर्ष जुने उद्यान हडप करण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप येथील स्थानिक आणि आंबेडकरी जनतेने पत्रकारांशी बोलताना केला.
रविवारी १० जानेवारीला दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन भाऊ आहिर यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी उद्यान बचावासाठी विभागातील आंबेडकरी जनता निषेध मोर्चा काढणार आहे. यावेळी आंबेडकरी जनता व स्थानिक नागरिक सचिन भाऊ आहेर व नगरसेवक हारून खान यांना काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध व्यक्त करणार आहे, तसेच उद्यानात पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यास तीव्र विरोध करणार असल्याचेही स्थानिकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
No comments yet.