रविराज शिंदे
वीज मीटर बॉक्समध्ये लागलेल्या भीषण आगीत घरातील दोन सिलेंडरचा स्फोट होऊन एका महिलेसह दोन मुलांचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना काल शनिवारी पार्कसाईट येथे घडली. अग्निशमन दलाच्या ४ फायर इंजिन आणि ३ पाण्याच्या बंबाच्या मदतीने तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
४ महिन्यापूर्वीच विक्रोळी पार्कसाईट येथील सिलेंडर स्फोटात सात जणांना आपले जीव गमवावे लागले असताना, काल शनिवारी पुन्हा पार्कसाईट येथे घरगुती सिलेंडरचा भयंकर स्फोट झाल्याची घटना दुपारी ३.३० वा. सुमारास घडली. घटनेत एकाच घरातील आई सहित दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सलमा बेलीम (३५), मोहम्मद बेलीम (१२), मेहराज बेलीम (१५) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम इब्राहीम बेलीम हे आपली पत्नी सलमा, मुले सायना, मोहम्मद आणि मेहराज यांच्या सोबत पार्कसाईट येथील रोड क्रमांक ३ येथे राहतात. तळमजल्यावर त्यांचे गादी बनवण्याचे दुकान आहे तर वरच्या मजल्यावर त्यांनी आपला संसार थाटलेला आहे. शनिवारी दुपारी जेवणानंतर ते आपली मोठी मुलगी सायना हिच्या सोबत खाली गाद्या बनवत बसले होते, तर पत्नी आणि दोन मुले ही वरील माळ्यावर झोपलेली होती.
तीन वाजण्याच्या सुमारास मीटर बॉक्समध्ये स्पार्क होऊन आग लागल्याचे लक्षात येताच सलीम आणि सायना यांनी बाहेर पळ काढत, शेजाऱ्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र आग नियंत्रीत होण्याऐवजी वाढतच होती आणि पाहता पाहता तिने त्यांची पत्नी आणि मुले झोपलेल्या वरच्या मजल्यालाही आपल्या ताब्यात घेतले. आगीच्या भडक्यामुळे सलमा आणि दोन मुलांना बाहेर पडणे शक्य होत नव्हते, म्हणून ते मदत मिळेपर्यंत एका कोपऱ्यात लपून बसले होते. मात्र वरच्या मजल्यावर पोहचलेल्या आगीच्या भक्षस्थानी घरातील दोन सिलेंडर येऊन स्फोट झाल्याने घराच्या चिंध्या उडाल्या आणि त्यातच ते तिघे होरपळून गेले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाली, मात्र केवळ पाच मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहचण्यास रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्या आणि वाहतूक कोंडीतून मार्ग काढत काढत पोहचण्यास ४० मिनिटे लागली. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवून गंभीर जखमी सलमा, मोह्मद व मेहराज यांना राजावाडी येथे घेवून जाण्यात आले परंतु त्यांच्या तत्पूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
No comments yet.