श्रावण पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी भारतीय संस्कृतीत बहिण आपल्या भावाला आपल्या बंधू प्रेमाचे प्रतिक आणि दीर्घायुष्यासाठी राखी बांधते, तर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. पवईतील महिला आणि विद्यार्थिनीनी खऱ्या अर्थाने भावाचे कर्तव्य निभावणाऱ्या आणि केवळ आपल्याच नव्हे तर देशातील प्रत्येक बहिणींच्या रक्षणासाठी तत्पर असणाऱ्या वर्दीतील रक्षक पोलीस आणि सैनिक यांना राखी बांधत हा सण साजरा केला.
कोणताही सण असो मुंबई पोलीस आपल्या घरी नसतोच, तो असतो तो मुंबईकरांच्या रक्षणासाठी बंदोबस्तात उभा. रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा कायदा-व-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आपल्या कर्तव्यावर हजर झाले होते. मुंबईच्या प्रत्येक महिलेच्या सुरक्षेसाठी तत्पर हजर असणाऱ्या या पोलीसवाल्यांना राखी बांधण्यासाठी महिलांनी पवई पोलीस ठाण्यात रविवारी गर्दी केली होती.
यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना राखी बांधण्यासोबतच मिठाईचे वाटप सुद्धा करण्यात आले.
तर दुसरीकडे आयआयटी येथील पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये विद्यार्थिनीनी ‘धागा शौर्याचा, राखी अभिमानाची’ उपक्रमांतर्गत स्वतः बनवलेल्या आकर्षक राख्या आपल्या देशाच्या संरक्षणासाठी देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांना पाठवून आपला रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आकर्षक पोस्टकार्ड बनवून त्यांच्यासाठी आपला संदेश लिहला.
No comments yet.