मुंबईमध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाट आणि वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे हवेत बराच गारवा निर्माण झाला होता. पवई भागात वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ईडन इमारत परिसरात उभे असणारे एक झाड उन्मळून पडले. लागूनच असणाऱ्या सुरक्षा भिंतीवर हे झाड पडल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारचे मोठे नुकसान झाले नाही.
पावसाने दडी मारल्याने राज्यावर दुष्काळाचा डोंगर कोसळला होता. गेली अनेक दिवस दडी मारून बसलेल्या वरुणराजाला गुरुवारी आगमन झालेल्या बाप्पाने आपल्या सोबत आणले आणि संपूर्ण महाराष्ट्राला जोरदार पावसाने दिलासा दिला. परतीच्या प्रवासात असणाऱ्या या पावसामुळे दुष्काळ दूर होणे शक्य नसले तरी पाणीटंचाई दूर करण्यासाठी याची नक्कीच मदत होणार आहे.
गायब झालेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार पुनरागमन केल्यामुळे मुंबईकर सुद्धा सुखावले आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशीही मुंबईकरांना असाच अनुभव आला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारासच मुसळधार पावसाच्या सरींवर सरी कोसळू लागल्या. या पावसामुळे काही मुंबईकरांनी सकाळीच बाहेर निघून ठिकठिकाणी भिजण्याच्या आनंद घेतला, तर काहींनी घरात बसून चहा-भजीचा आस्वाद घेत पाऊस अनुभवला.
वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे सुद्धा उन्मळून पडली होती. हिरानंदानी येथील ईडन इमारत क्रमांक चारमधील एक झाड सुद्धा या पावसात उन्मळून पडले; परंतु झाडालाच लागून असणाऱ्या सुरक्षा भिंतीवर या झाडाला आधार मिळाल्याने मोठे नुकसान होणे टळले.
No comments yet.