आमचा सन्मान आम्हास दया या मागणीसाठी पवईमधून संघटीत होण्यास सुरुवात झालेल्या मुंबई माजी-सैनिक असोसिएशनच्यावतीने ठाणे येथे ‘स्वाभिमान रॅलीचे’ आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील माजी-सैनिकांनी सहभाग घेवून दिल्लीमध्ये होत असलेल्या लढाईत आम्ही सुद्धा सोबत असल्याचा संदेश दिला. महिन्यातून किमान एकदा एकत्रित येऊन आपण सरकारला आपली ताकद दाखवून देवू, असा प्रण करून ठाणे येथील ‘धरती के लाल’ सैनिक स्मारकावर आदरांजली वाहत रॅलीची सांगता करण्यात आली.
या बाबत बोलताना असोसिएशनचे सेक्रेटरी निवृत्त कर्नल एस सी मन म्हणाले, “देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या व आपले रक्त सांडणाऱ्या लष्करी कर्मचाऱ्यांची सरकार आणि सरकारी बाबू जाणूनबुजून स्थिती अवनत करीत आहेत. त्यांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. एक पद एक वेतन श्रेणीवर कोशियारी समितीच्या निर्णयानंतरही, सैनिकांचा हक्क अजूनही सरकारी फायली आणि अनुमतींमध्ये चकरा मारत फिरतोय हे दु:खद आहे. गेल्या आठवड्यात मंजुरीच्या नावावर सरकारने जो खेळ आमच्या सोबत चालवलेला आहे, तो आम्हास मंजूर नाही. आमचा हक्क आम्हास विना शर्थ आणि विना वेडीवाकडी वळणे घेता दयावा हिच आमची मागणी आहे.”
“आम्ही सैनिक आहोत आम्हाला लिहून दया अशी म्हणण्याची कधीच गरज पडली नव्हती, वरिष्ठ अधिकाऱ्याने आदेश दिला, कि तो पाळायचा असा आमचा नियम आहे. नाहीतर कमांडर ने सावधान म्हटले कि आधी लिहून दे मग सावधानमध्ये उभा राहतो असे झाले असते. सरकारी बाबतीत सुद्धा मंजुरी दिली म्हणजे झाले असे मानत आम्ही निर्धास्त होतो; पण हे राजकीय नेते, सरकारी बाबू दिलेला शब्द म्हणजे आदेश मानत नाहीत हे आम्हाला माहितच नव्हते. सीमेवर आम्ही रक्त सांडत संरक्षण दिल्यानंतर, आमचा हक्क मागितल्यावर पोलिसांची दांडकी खावी लागतात, त्यानंतर वेडीवाकडी वळणे घेत मंजुरीचे ढोलताशे वाजवून त्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. आम्हाला आमचा हक्क हवा आहे भिक नाही” अशा कडक शब्दात असोसिएशनचे अध्यक्ष कॉमोडर बिमल मिस्त्री यांनी आपला निषेध व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले “या रॅलीचे प्रमुख उद्देश हे दिल्लीत आमचे बंधू जे आंदोलन करत आहेत त्यास पाठींबा देणे तर आहेच, सोबतच जनतेला आमच्या खऱ्या मागण्या काय आहेत हे समजून देणे आहे. सरकार ओरप (दाबून खा) असा याचा अर्थ आहे असा गैरसमज सामान्य नागरिकांमध्ये पसरवत आहे. प्रत्यक्षात मात्र तसे नाही आहे. शहिदांच्या विधवा, छोट्या हुद्यांवर काम केलेले सैनिक, १९९० पूर्वी निवृत्त झालेले आमचे बंधू यांना योग्य मोबदला मिळावा म्हणून ही आमची लढाई आहे. एक पद एक वेतन श्रेणी आमचा हक्क आहे. पण सरकार हा मुद्दा चिघळवत सैनिकांचे मनोबल कमी करण्याच्या मागे आहे. जाणूनबुजून घडवून आणलेली सुडबुद्दी, द्वेष, इर्षेचे प्रदर्शन याचे परिणाम सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांवर पडत आहे याचा कदाचित त्यांना विसर पडलेला आहे. आम्ही हार न मानता आजपर्यंत देशद्रोह्यांशी लढलो आहोत, आता हक्कासाठी स्वतःच्या लोकांशी लढाई लढावी लागली तरी आम्ही तयार आहोत.”
शेवटी आनंदनगर येथील ‘धरती के लाल’ सैनिक स्मारकावर शहिदांना आदरांजली वाहून, किमान महिन्यातून एकदा एकत्रित येऊन आपले प्रश्न, समस्या जाणून घेवू एकमेकांना मदतीचा हाथ देऊ आणि आपले हक्क आणि अधिकार सन्मानाने मिळवू असा प्रण घेऊन या रॅलीची सांगता करण्यात आली.
No comments yet.