पवईतील एका नामांकित विकासकाला २० करोडची खंडणी मागणाऱ्या पुणे जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे (४५) आणि त्याचा गाडी चालक विठ्ठल फालके (४२) याला न्यायालयाने आज (गुरुवार) दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. बुधवारी पवई पोलिसांनी त्यांना मुलूंड येथील हॉटेलमधून खंडणीचा १ करोड रुपयाचा हप्ता स्विकारताना रंगेहाथ पकडले होते.
विकासक यांच्याकडे २७ वर्ष नोकरी करणारा पाखरे २०१६ च्या शेवटी नोकरी सोडून आपल्या मूळ गावी जुन्नर येथे एका राजकीय पक्षात प्रवेश करत जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आला होता. ज्यानंतर त्याने विकासक यांच्या विविध ठिकाणी असणाऱ्या कामांवर हरकत घेत बृहन्मुंबई आणि भूमापन विभागात तक्रार अर्ज दाखल केले होते.
‘पारखे याने घेतलेल्या हरकतीमुळे विकासकाचे अनेक प्रोजेक्ट लांबणीवर पडले होते. यासंदर्भात कंपनीने त्याला हरकती घेण्यामागचे कारण विचारले असता त्याने त्या सर्व तक्रारी मागे घेण्यासाठी २० करोड रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती’ असे पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले.
विकासकाला प्रोजेक्ट मंजुरीसाठी वारंवार होणाऱ्या दिरंगाई पाहता पारखे याला जानेवारीमध्ये १० लाख रुपये देण्यात आले होते. मात्र, तेवढ्यावरच त्याचे पोट भरले नसल्यामुळे त्याने विकासकाकडे २० कोटीच्या खंडणीचा तगादा लावला होता. अखेर विकासकाकडे लायजनिंग ऑफिसर म्हणून काम करणारे अर्जुन धायतडके यांनी १४ मार्चला पवई पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली.
‘पूर्वी काम करणाऱ्या एका कामगाराने विविध सरकारी कार्यालयात विकासक यांच्याविरोधात तक्रारी करून, त्या तक्रारी पाठीमागे घेण्यासाठी २० लाख रुपयाची खंडणी मागितल्याची तक्रार विकासक यांचे लायजनिंग ऑफिसर यांनी पवई पोलीस ठाण्यात केली होती. या खंडणीचा हफ्ता घेण्यासाठी तो येणार असल्याची माहिती सुद्धा तक्रारदार यांनी यावेळी पोलिसांना दिल्यानंतर सापळा रचत खंडणीची रक्कम स्विकारताना आम्ही आरोपी आणि त्याच्या एका साथीदाराला मुलुंड येथील हॉटेलमधून अटक केली आहे.’ असे याबाबत बोलताना पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.
‘तक्रारदार यांच्यात झालेल्या फोनवरील संभाषणात तक्रारदार हे वारंवार पैसे घेण्यासाठी त्याला बोलवत असल्यामुळे आरोपीला शंका निर्माण झाली होती. त्यामुळे पवई परिसरात सापळा लावल्यास तो फसू शकण्याची शक्यता पाहता, नवतरुण आणि अनुभवी अशा दोन्ही प्रकरच्या अधिकाऱ्यांची मिळून एक विशिष्ट टिम तयार करून, मुलूंडमधील एका हॉटेलात सापळा लावून त्याला तिथे रंगेहाथ पकडले.’ असे याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.
पवई पोलिसांनी भादवि कलम ३८४, ३४ नुसार गुन्हा नोंद करून अटक दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
No comments yet.