पवई तलाव भागात मॉर्निंग वॉकला येणारे, सकाळी कामावर जाणारे आणि पर्यटक अशा सर्वांना पवई तलावाच्या भागात जवळपास ८ फुटी मगरीचे दर्शन घडल्याने, शुक्रवारची सकाळ ही पवईकर आणि येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मगर दर्शन घडवणारी सकाळ ठरली. काही वेळाने तलावातील गाळ काढण्याचे काम करणारे यंत्र जवळ येताच मात्र ही मगर पुन्हा पाण्यात परतल्याने, याची खबर लागल्यावर उशिरा पवई तलाव भागात पोहचलेल्या लोकांचा मात्र दर्शन न घडल्याने हिरमोड झाला.
पवई – विहार तलावात अनेक मगरी आहेत. काही मगरी उन्हासाठी अधेमध्ये किनाऱ्यावर येतात अन् पुन्हा पाण्यात जातात. अशीच एक मगर शुक्रवारी सकाळी पवई तलाव भागातील हिरानंदानी बस थांब्याच्या पाठीमागील तलावातील टेकडीवर हवा आणि ऊन घेण्यासाठी आली होती. जवळपास ८ फूट लांबीची ही मगर असल्याचे प्रत्याक्षदर्शींचे म्हणणे आहे. पावसाळा वगळता हिवाळा आणि उन्हाळ्याच्या काळात पवई तलाव भागात विविध ४ ते ५ ठिकाणी अशा प्रकारे मगरींचे दर्शन घडत असते. मात्र गेली बरीच महिने आणि पवई तलावाचे गाळ उपसण्याचे काम चालू असताना यांना ऊन खात बसण्यासाठी लागणारे टेकड्याच संपुष्टात आल्याने मगरीचे दर्शन दुर्लभ झाले आहे. शुक्रवारी मगर निघाल्याचे कळताच म्हणूनच तिला पाहण्यासाठी लोकांची अक्षरशः गर्दी उसळली होती.
याबाबत बोलताना स्थानिक नागरिक पंकज लाड यांनी सांगितले, “मी सकाळी या परिसरातून जात असताना मला एक मगर तिथे तयार झालेल्या टिल्यावर चढताना आढळून आली, मी फोटो घेत आहे हे पाहून लोकांचीही हळूहळू काय आहे हे पाहण्यासाठी गर्दी जमा होऊ लागली. लोक फोन करून आपल्या मित्रमंडळीना आणि परिवाराला मगर निघाल्याचे सांगत होते, तर कोणी फोटो घेऊन अपलोड करण्यात गुंतलेले होते.”
अजून एक स्थानिक एस मिश्रा यांनी सांगितले कि, मगर बाहेर रोडवर आल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात आणि मुंबईमध्ये पसरत होती. मला सुद्धा अशी माहिती मिळाल्याने मी तिला पाहण्यासाठी आलो होतो पण मगर परत पाण्यात निघून गेली होती. ती रोडवर आल्याची बातमीही खोटी होती प्रत्यक्षात ती पाण्यातील टेकडीवरच आली होती.”
“तलावात मगरींचे प्रमाण खूप मोठे आहे. पवई तलाव सौंदर्यकरणाच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करणाऱ्या आणि या मगरींचे नैसर्गिक ठिकाणांना उद्धवस्त करणाऱ्या पालिका प्रशासनाने मगरींसाठी अश्या टेकड्या परत बनवावेत अशी मागणी करणारे पत्र आम्ही संबधित विभागांना देणार आहोत. यामुळे मगरींना आपले हक्काचे घर तर मिळणारच आहे, सोबतच पर्यटक आणि पवईकर यांना सुद्धा मगरींचे सुरक्षित दर्शन घडेल” असे आवर्तन पवईशी बोलताना ‘पॉज मुंबई’ या संस्थेचे सुनिश सुब्रमण्यम कुंजू यांनी सांगितले.
शनिवारी संध्याकळी हि त्याच ठिकाणी मगरीचे पुन्हा दर्शन काही लोकांना घडल्यामुळे आता काहीकाळ तरी अधून मधून या ठिकाणी मगरीचे दर्शन घडू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
No comments yet.