संघर्षनगरकरांची पर्यायी मार्गाची फरपट आता संपली असून, बिल्डिंग क्रमांक ३२ पासून महाराष्ट्र काटा, खैराणी रोड पर्यंतच्या पर्यायी रस्त्याचे काम नगरसेवक निधीतून केले गेले आहे. या रस्त्यामुळे गेल्या ७ वर्षापासून पर्यायी मार्गासाठी संघर्षनगरकरांची चाललेली फरपट थांबली असून, घाटकोपर, साकिनाका या भागातून येणाऱ्या छोट्या गाड्यांना आता फिरून येण्याची गरज उरलेली नाही. या रस्त्याच्या मार्गे सरळ संघर्षनगरमध्ये प्रवेश करता येणार असल्याने अनेकांचा वेळ आणि कष्ट वाचणार आहेत.
झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत बोरिवली राष्ट्रीय उद्यान परिसरात असणाऱ्या झोपडपट्टी धारकांचे चांदिवली येथील संघर्षनगर येथे पुनर्वसन केले गेले आहे. पुनर्वसित होण्याच्या कारणाने या परिसरात सत्ताधाऱ्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले आहे. रहायला आल्यानंतर अनेक वर्ष या परिसरातील लोकांची मुलभूत सुविधांसाठी लढाई चालू होती आणि अजूनही चालूच आहे. हळूहळू या परिसरात सुविधा मिळू लागल्या आहेत खऱ्या, परंतु अजूनही बरेच प्रश्न मार्गी लागणे बाकी आहेत. या सर्वात महत्वाचा प्रश्न होता तो पर्यायी मार्ग म्हणून महाराष्ट्र काटा परिसरातील काही भाग साफ झाल्यानंतर तयार झालेले एक बोळकांड सोडले तर, या परिसरात प्रवेश करणारा आणि बाहेर निघणारा असा प्रमुख एकच रस्ता आहे.
जो रस्ता आहे तो सुद्धा उखडलेला आणि दगड धोंड्याचा. या परिसरात एखादी आपत्ती आली तर लोकांना बाहेर निघण्यासाठी केवळ एकच खराब रस्ता उपलब्ध असल्याने, लोकांची कोंडी होऊन बसली होती. या बाबत स्थानिक नगरसेवक ईश्वर तायडे यांच्याकडे लोकांच्या तक्रारी पोहचताच, त्यांनी प्रथम महाराष्ट्र काटा परिसरात असणाऱ्या सांडपाणी वाहून नेण्यासाठी बंदिस्त गटाराचे काम करून त्याच्यावरून खैराणी रोडला जोडणारा पर्यायी मार्गाची निर्मिती केली आहे.
अनेकवेळा नहार भागात रस्त्याचे काम चालू असल्याने चांदिवली, साकीविहार मार्गे साकिनाका आणि घाटकोपरकडे प्रवास करणाऱ्या लोकांची एक मोठी चक्कर वाचली असून, आपत्ती काळात लोकांना बाहेर निघण्यास सोयीस्कर झाले असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.
No comments yet.