सौदी अरेबियात मोठ्या पगाराची नोकरी लावून देतो असे सांगून, अनेक तरुणांना गंडा घालणाऱ्या भामट्यांच्या टोळक्यातील एकाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. वलीउल्ला बेतुल्ला कुरेशी असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील ही दुसरी अटक आहे. जानेवारी महिन्यात यातील पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली होती.
हिरानंदानी येथील पवई प्लाझामध्ये गेल्या वर्षी एक एच आर प्लेसमेंट कंपनी उघडून तरुणांना विदेशात नोकरी मिळवून देतो अशा आशयाच्या जाहिराती इंटरनेट, आणि विविध माध्यमातून केल्या गेल्या. याच जाहिरातींना पाहून ऑक्टोबर २०१६ मध्ये तक्रारदार तरुणीने येथे आपल्या नोकरीसाठी अर्ज केला होता. या अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आणि गरजेच्या कागदपत्रांची पूर्तता करून ९१ हजार रुपये सुद्धा तरुणीने या ठिकाणी भरले होते.
काही दिवसांनी तिला फोनवर सौदी अरेबिया येथे दोन वर्षासाठी नोकरीची संधी आली आहे असे सांगून मुलाखत आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात आले. ज्यानंतर तिला २८ ऑक्टोबरला सौदीसाठी निघायचे आहे, तेव्हा २७ तारखेला व्हिसा आणि तिकीट घ्यायला या असे सांगण्यात आले. मात्र तरुणी जेव्हा २७ तारखेला तिकीट घ्यायला पोहचली तेव्हा कंपनीला टाळे होते.
आसपास केलेल्या चौकशीत कंपनी बरेच दिवस झाले बंद झाली आहे असे समजताच तिने नोकरीच्या आमिषाने आपली फसवणूक केली असल्याचा गुन्हा पवई पोलीस ठाण्यात दाखल केला. ज्यानंतर अशाच प्रकारे या कंपनीने अजूनही ३४ जणांची २६ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार अर्जाद्वारे प्राप्त झाल्या.
याचा तपास करणाऱ्या पवई पोलिसांनी जानेवारी महिन्यात इझहार हुसेन इक्बाल हुसेन या भामट्याला अटक केली होती. सध्या तो न्यायालीन कोठडीत आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अखेर गेल्या आठवड्यात पवई पोलिसांनी कुरेशीला अटक केली आहे.
या गुन्ह्यातील यांचे अजून तीन साथीदार नागेश उर्फ मिलिंद, नीलसिंग उर्फ रिझवान आणि राकेश उर्फ अरुण उर्फ अरविंद यांचा पवई पोलीस शोध घेत आहेत.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.