हिरानंदानीतील अनधिकृत बांधकामावर पालिकेची दुसऱ्यांदा कारवाई

1

काही दिवसांपूर्वीच कारवाई केल्यानंतर सुद्धा पुन्हा उभे राहिलेल्या हिरानंदानीतील मार्केटवर मंगळवारी परत एकदा महानगरपालिका ‘एस’ विभागाच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने कारवाई केली. पोलीस बंदोबस्तात हिरानंदानीतील सायप्रेस, डैफोडिल मार्केटमधील फुटपाथवर थाटण्यात आलेल्या दुकान व अनधिकृत बांधकामांसह, पवई प्लाझा भागात रस्त्यावर उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थाच्या गाड्यांवर सुद्धा पालिकेने कारवाई करत या भागातील अनधिकृत व्यवसायाला दणका दिला आहे.

एकेकाळी मोकळ्या जागेचे आणि खुल्या मार्केटचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवईतील हिरानंदानी भागातील शॉपिंग प्लाझा आणि मार्केट्समध्ये फुटपाथवर दुकाने थाटून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. काही दुकानदारांनी दुकाना पुढील मोकळी जागा हडप करून, त्या जागा दुसऱ्या दुकानदारांना भाड्याने देवून मलाई खात आहेत.

याबाबत येथील स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांनी पालिका प्रशासनाला वारंवार तक्रारी केल्यानंतर पाठीमागील महिन्यात हिरानंदानीतील अनेक ठिकाणी अनधिकृत दुकानांवर पालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. मात्र कारवाईनंतर सुद्धा या मार्केटमध्ये काही खास फरक पडला नव्हता, दुकानदारांनी संध्याकाळ पर्यंत पुन्हा आपली दुकाने थाटलेली होती.

याबाबत स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांनी पालिका प्रशासनाकडे पुन्हा पाठपुरावा करत तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी अतिक्रमण हटवण्याची ठोस कारवाई करण्याची मागणी केली होती.

मंगळवारी पुन्हा मोठ्या फौजफाट्यासह हिरानंदानीतील सायप्रेस, डैफोडिल मार्केट येथे पोहचलेल्या पालिका एस विभागाच्या अतिक्रमण निर्मुलन अधिकाऱ्यांनी येथील अनिधिकृत बांधलेले बांधकामावर कारवाई करत, संपूर्ण अतिक्रमण कोणत्याही दबावाला बळी न पडता हटवत पालिका मोठ्या धनदांडग्यावर सुद्धा कडक कारवाई करू शकते याचे प्रतिक दिले.

मंगळवारच्या कारवाईनंतर सुद्धा या मार्केटमध्ये संध्याकाळ पर्यंत काही दुकानदारांनी पुन्हा आपली दुकाने थाटलेली होती, मात्र अनेक ठिकाणी या कारवाईचा फरक जाणवत होता आणि मार्केट खरेदीसाठी आलेल्या लोकांना चालण्या फिरण्यासाठी खुले वाटत होते.

याच वेळी पालिकेने पवई प्लाझा भागात बेकायदा पद्धतीने चालत असणाऱ्या खाद्य पदार्थांच्या गाड्यांवरती सुद्धा कारवाई करत, नव्याने जम बसवत असलेल्या या अतिक्रमणासही चांगलाच दणका दिल्याने संध्याकाळी या परिसरात होणारी गर्दी आणि वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत नव्हती.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 
 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!