दिर्घ आजारावर उपचार चालू असून, त्रास असह्य होत असल्याने, हिरानंदानी येथील मार्बल यार्डमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने इलेक्ट्रिसिटीच्या वायरने झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली आहे. पिडीत व्यक्तीचे नाव श्रीकांत नंदकिशोर प्रसाद (३५) असे असून तो बिहारचा रहिवाशी आहे. याबाबत पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून त्याचे राजावाडी येथे शवविच्छेदन केले असता त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा बिहारचा असणारा श्रीकांत हा गेले अनेक दिवस पोटाच्या आजाराने त्रस्त होता. दिल्ली येथे कामाला असताना त्याला प्रथम त्रास जाणवू लागल्याने तिथेच उपचार सुरु केले होते. त्रास कमी होत नसल्याने त्याने आपल्या मूळगावी बिहार येथे जाऊन उपचार घेतले. थोडे बरे वाटू लागल्यामुळे गेल्या महिन्यात पुन्हा मुंबईकडे कामासाठी धाव घेतली. त्याचे सासरे हिरानंदानी येथील मार्बल यार्डात काम करत असल्याने त्यांनी श्रीकांतला ही तिथेच कामावर रुजू करून घेतले होते.
कामाचा तान पडल्याने पुन्हा त्याला पोटाच्या दुखण्याचा त्रास जाणवू लागला आणि सततच्या या त्रासापासून कंटाळलेल्या श्रीकांतने अखेर यार्डाजवळील एका झाडाच्या फांदीला इलेक्ट्रिसिटीच्या वायरने गळफास लावून आत्महत्या केली.
“आम्हाला सूचना मिळताच आम्ही त्वरित घटनास्थळी दाखल होत जखमीला राजावाडी हॉस्पिटल येथे नेले, पण तिथे आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदनात त्याचा गळफास लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे” असे आवर्तन पवईशी बोलताना पो.उ.नि. महिडा यांनी सांगितले.
No comments yet.