आपल्या महाविद्यालयीन मित्रांसोबत विहार तलाव भागात फिरण्यासाठी गेलेल्या पवईतील एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. दिपक शिवाजी कुटे (१८) असे या तरुणाचे नाव असून, तो आयआयटी कॅम्पसमध्ये आपल्या परिवारासोबत राहत होता. याबाबत मुलुंड पोलिस अपघाती मृत्यूची नोंद करून अधिक तपास करत आहेत.
गेल्या काही वर्षात पवई आणि आसपासच्या भागात असणारे तलाव मुंबईकरांसाठी आकर्षणाची आणि पर्यटनाची ठिकाणे बनली आहेत. कॉलेज तरुणांसाठी तर ही ठिकाणे म्हणजे आपले दुसरे कट्टेच. बुधवारी तीन महाविद्यालयीन विद्यार्थी दिपक कुटे (पवई), हितेश पाल (पवई) आणि अभिषेक कोळेकर (भांडूप) हे विहार तलाव भागात फिरण्यासाठी गेले होते.
त्याच्या दोन्ही मित्रांनी दिपक पाण्यात बुडाल्याची माहिती आसपास असणाऱ्या माणसांना आणि आम्हाला दिली. आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो मिळून आला नाही, असे पोलिसांना दिलेल्या जवाबात त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
‘आम्ही त्वरित व्यक्ती हरवल्याची नोंद घेत तपास सुरु केला असता, त्याचा एक मित्र राजावाडी रुग्णालयात दाखल केला असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्याचा जवाब घेण्याचे सुरु असतानाच रात्री उशिरा दिपक याचे शव मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून आल्याची माहिती मिळली’ असे याबाबत सांगताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
‘तरुण मद्यप्राशन करून पाण्यात उतरले होते, ज्यात दोन तरुणांना वाचवण्यात आले तर दिपकचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे’, असे माध्यमांशी बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.