मुंबईच्या विविध भागात मोटारसायकली सोबतच रस्त्यावर पार्क गाड्यांचे सायलेंसर चोरी करणाऱ्या टोळीने धुडगूस घातला आहे. अशाच दोन घटना पवई परिसरात घडल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास करताना पवई पोलिसांनी सायलेंसर चोरी करणाऱ्या टोळीच्या सदस्यांपैकी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.
मुसाहीद हजरत अली खान (वय २१ वर्षे) राहणार कालिना सांताक्रूझ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्या ताब्यातून अंदाजे २,०७,००० किमतीचे ६ सायलेंसर हस्तगत केले आहेत.
पवईच्या मिलिंदनगर भागात राहणारे फिर्यादी यांनी त्यांच्या मालकीचा सुपर कॅरी टेम्पो एमएच ०५ एईएल ००३५ हा २५ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ वाजता तिवारी कंपाऊंड भागात पार्क केला होता. दुसऱ्या दिवशी २६ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता ते आपली गाडी घेवून जाण्यास आले असता, त्यांच्या टेम्पोचा सायलेंसर दिसून आला नाही. त्यांनी व्यवस्थित तपासून पाहिले असता कोणीतरी तो काढून चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले. “याबाबत ते आसपास चौकशी करत असतानाच त्याच परिसरात पार्क केलेला राजू खरात यांच्या टेम्पोचा सायलेंसर देखील कोणीतरी काढून नेल्याची माहिती समोर आली. सायलेंसर चोरी झाल्याची खात्री होताच अनोळखी व्यक्तीविरोधात पवई पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला,” पवई पोलिसांनी सांगितले.
सहाय्यक पोलीस आयुक्त – साकीनाका भरतकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत आणि पोलीस निरीक्षक गुन्हे गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश आव्हाड आणि गुन्हे प्रकटीकरण पथक यांच्यावर या गुन्ह्याची उकल करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
यासंदर्भात खबऱ्याच्या मदतीने तपास सुरु असतानाचा पोउनी गणेश आव्हाड यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून या गुन्ह्यात सहभागी गुन्हेगाराबाबत खात्रीलायक माहिती प्राप्त झाली होती. “त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने सापळा रचून नमूद आरोपीला मोह्मदिया मस्जिद, सिएसटी रोड, कुर्ला येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता, आरोपीने आपल्या इतर साथीदारांसोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली.” असे आव्हाड यांनी सांगितले.
याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत म्हणाले, “आरोपीकडून ६ सायलेंसर हस्तगत केले असून, त्यातील २ हे पवईच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबईच्या आणखी कोणकोणत्या परिसरातील गुन्ह्यात आरोपीचा सहभाग आहे याबाबत आम्ही माहिती मागवली आहे.
“अटक आरोपी हा एकटा नसून, त्याची संपूर्ण टोळी यासाठी कार्यरत आहे. आम्ही त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहोत,” असेही पवई पोलिसांनी सांगितले.
पोउनि गणेश आव्हाड, पोह दामू मोहळ,पोह सावंत, पोशि देशमुख, पोशि भोये, पोशि धुरी, मपोशि शीतल लाड यांच्या पथकाने हा गुहा उघडकीस आणला.
No comments yet.