हिरानंदानी परिसरात संध्याकाळी वॉक करून घरी परतत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचून पळून गेलेल्या आरोपीला ३६ तासाच्या आत पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिवा येथून पवई पोलिसांनी त्याला अटक केली. पंनेलाल मंहत चौहान (२७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पवई पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली मालमत्ता (सोन्याची चैन) हस्तगत केली आहे.
पवईतील पंचकुटीर परिसरात राहणाऱ्या हरजीतकौर सिंग सैनी (५८) या सोमवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे वॉक घेण्यासाठी हिरानंदानी येथील पालिका उद्यानात आल्या होत्या. ८ वाजता वॉक संपवून त्या हिरानंदानी येथील ओर्चीड अव्हेन्यूवरून चालत असताना एका अज्ञात तरुणाने पाठीमागून येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचून पळ काढला होता.
“महिलेने आरडाओरडा करताच तरुणाने जवळच असणाऱ्या एम्ब्रोसिया उद्यानात धाव घेतली. आम्ही संपूर्ण उद्यानात त्याचा शोध घेतला, मात्र उद्यानाच्या दुसऱ्या बाजूने उडी मारून तो पसार झाला होता,’ असे पवई पोलिसांनी सांगितले.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लाड यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथक तपास करत होते.
“फुटेजमध्ये दिसणाऱ्या वर्णनाचा इसम हा चांदिवली संघर्षनगर परिसरात राहत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. तिथे जावून चौकशी केली असता तो ठाणे येथील दिवा परिसरात राहत असल्याची खात्रीलायक माहिती आमच्या गुप्त बातमीदाराकडून आम्हाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने दिवा येथे पाळत ठेवून आम्ही आरोपीला ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली,’ असे पोलीस म्हणाले.
“आरोपीकडून चोरीस गेलेली सोनसाखळी हस्तगत करण्यात आली आहे”, असे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत यांनी सांगितले.
भादवि कलम ३९२ नुसार नोंद गुन्ह्यात पंनेलाल याला अटक करून, त्याचा आणखी काही गुन्ह्यात सहभाग आहे का? याबाबत पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश पाटील, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि विनोद पाटील, सपोनि विनोद लाड, पोलिस हवालदार बाबू येडगे, सावंत, पोलिस नाईक आदित्य झेंडे, अभिजित जाधव, पोलिस शिपाई संदीप सुरवाडे, धुरी, भोये यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
No comments yet.