चौकशी दरम्यान पोलिसांनी त्यांना भारतीय नागरिक असल्याचे दर्शविणारी कागदपत्रे दाखविण्यास सांगण्यात आले मात्र ते तसे करण्यास अक्षम ठरले त्यानंतर त्या बांग्लादेशींना अटक करण्यात आली.
मरोळ आणि सहार परिसरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या २ बांग्लादेशींना साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींपैकी एक जण मरोळ, चिमटपाडा येथे राहत होता आणि टेलर म्हणून काम करीत होता. तर त्याचा मामा सहार येथे राहत असून, रोजंदारीवर मजूर म्हणून काम करीत होता. तर पवई येथील एका दर्गाजवळ पूजेचे सामान विक्री करणाऱ्या एका बांग्लादेशीवर पवई पोलिसांनी कारवाई केली आहे. दोन्ही घटनेतील आरोपींवर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात माहिती देताना साकीनाका पोलिसांनी सांगितले की, पोलीस ठाण्याचे एटीसी पथक परिसरात गस्त घालत असताना काजूपाडा परिसरात एक बांग्लादेशी नागरिक येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांच्या दहशतवादविरोधी कक्षाने काजूपाडा भागात सापळा रचला असता सेंट ज्यूड शाळेसमोर तो संशयित इसम येताच त्याला पथकाने ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीत त्याने आपले नाव रियाजुद्दीन मोहम्मद मुस्लिम (२१) असे सांगतानाच उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचा मोबाईल पोलिसांनी तपासला असता त्याच्या परिवाराचे बांग्लादेश येथील फोन नंबर मिळून आले. त्याला कागदपत्रे मागितली असता ते दाखवण्यात सुद्धा तो अक्षम ठरल्याने तो बांग्लादेशी असल्याची खात्री पटताच त्याला पोलिसांनी अटक केली.
रियाजुद्दीन याच्या चौकशीत तो मरोळ, चिमटपाडा येथे राहत असल्याचे सांगतानाच त्याचा मामा झाकीर हुसेन अब्दुल मतेन (वय ४५)हा सहार येथे राहत आहे. परिवारातील लोकांना बेकायदेशीर रित्या मुंबईत आणण्याचे काम मामा करत असल्याची कबुली सुद्धा त्याने दिली. “माहितीच्या आधारावर त्याचा मामा याला सुद्धा बेकायदेशीर वास्तव्यासाठी आम्ही अटक केली आहे,’ असे पोलिसांनी यासंदर्भात बोलताना सांगितले.
एका अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले की,मतेन यांच्या चौकशीत त्याने आपले जीवन खडतर मार्गाने जगत असल्याचे सांगत कुटुंबातील इतर सदस्यांना भारतात आणण्यासाठी बेकायदेशीर प्रयत्न केले असल्याची सुद्धा कबुली दिली. पोलिसांना संशय आहे की मतेन बनावट कागदपत्रांवर इतर बांग्लादेशी नागरिकांना सुद्धा देशात आणत असेल. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पवई येथील दर्गाजवळून एका बांग्लादेशी नागरिकाला अटक
पवई परिसरातील एका दर्ग्याजवळ एक व्यक्ती अनेक वर्षापासून राहत असून, तो बांग्लादेशी असल्याची माहिती पवई पोलिसांच्या एटीएस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी जावून चौकशी केली असता त्या नागरिकाकडे भारतीय नागरिकत्व दर्शवणारी कागदपत्रे मिळून आली नाहीत. त्याचे बांग्लादेशी असण्याचे पुरावे मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
No comments yet.