पवईत दोन ठिकाणी तयार होत आहेत विलगीकरण केंद्र

पवई विलगीकरण केंद्र

जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने (कोव्हीड १९) भारतात प्रवेश केला आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या १६६च्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मिळून सध्या ४८ पॉजीटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात पोहचलेल्या या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने सुद्धा ठोस पाऊले उचलली असून, ठिकठिकाणी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणासाठी सेंटर उभी करण्याची लगबग सुरु झाली आहे. पवईत दोन ठिकाणी अशी विलगीकरण केंद्र बनवण्याची तयारी सुरु आहे.

मुंबईमध्ये बाहेरील देशात अडकून पडलेले अनेक भारतीय दाखल होणार आहेत. यासाठी मुंबईची तयारी सुरु आहे. ३१ मार्चपर्यंत विविध देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या व्यवस्थेसाठी तयारी सुरु आहे. यासाठी पवईतील आयआयटी बॉम्बे आणि चांदिवली येथील पालिकेने बांधलेल्या प्रशिक्षण केंद्रात काही लोकांना विलगीकरणासाठी ठेवण्याची तयारी होत आहे. याशिवाय मरोळमधील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईनची व्यवस्था केली आहे.

चांदिवली येथील प्रशिक्षण केंद्रात अनेक कॉन्फरन्स रूम आहेत जिथे शंभर एक बेड ठेवण्यात येणार आहेत. या नंतरही येथे अजूनही बरीच जागा शिल्लक राहणार आहे. तसेच आयआयटी बॉम्बेमधील पवई तलावाला लागून असणाऱ्या कॅम्पसच्या आतील चार इमारतीत सुद्धा विलगीकरण केंद्र निर्माण करण्यासाठी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासंदर्भात संस्थेतर्फे येथे राहणाऱ्या सर्वांना इमेलद्वारे याबाबत कळवण्यात आले आहे.

या इमेलनुसार, आयआयटी कॅम्पस भागात अजूनही बरेच विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक, त्यांचे कुटुंबीय आणि इतर कर्मचारी आहेत. तीव्र आक्षेप असतानाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपल्या अखत्यारीत असणाऱ्या काही इमारती विलगीकरणासाठी ताब्यात घेण्यात येत आहेत. बाहेरील विविध देशातून येणाऱ्या सी-कॅटेगरी म्हणजेच ज्यांच्यात लक्षणे दिसून आली नाहीत अशा लोकांना येथे ठेवले जाणार आहे. हे क्षेत्र पोलिसांच्या मदतीने पूर्णपणे सुरक्षित करून या भागाला इतरांपासून वेगळे ठेवणार असल्याचे शाब्दिक आश्वासन जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिले आहे.

कृपया आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची अधिकतम संरक्षण करत काळजी घेण्याची सूचना सुद्धा या इमेलमधून करण्यात आली आहे.

विलगीकरण म्हणजे काय?

करोना विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी संसर्गजन्य प्रदेशांतून प्रवास करून आलेल्या प्रवाशांचे विलगीकरण (क्वारंटाईन) केले जात आहे. हे विलगीकरण त्या रुग्णासह समाजाच्याही हितासाठी आहे. त्यांना इतरांपासून दूर ठेवले जाते. दोन बेडच्या मध्ये काही ठराविक अंतर नेमून दिलेले असते. या व्यक्तीचा संपर्क काही कालावधीसाठी इतरांपासून पूर्णपणे बंद करण्यात येतो. लक्षणांच्या तीव्रतेनुसार वैद्यकीय निर्देशानुसार आहार दिला जातो. या रुग्णांपासून इतर कुणालाही संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येते. विलगीकरणासाठी घरामध्ये असलेल्या व्यक्तीला हवेशीर बंद खोलीत एकटे ठेवले जाते. कुटुंबापासून कमीत कमी एक मीटर अंतर ठेवणे गरजेचे असते. शक्यतो त्या ठिकाणी स्वतंत्र शौचालय असावे. सदर व्यक्तीने मास्कचा वा स्वच्छ धुतलेले कपड्याचा वापर करावा. प्रत्येकी सहा तास तासांच्या अंतराने ते बदलावे.

ही संपूर्ण प्रक्रिया करोनावर मात करण्यासाठी आहे. संसर्ग फैलावू नये यासाठी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागानेही केले आहे.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!