भरधाव वेगात धावणाऱ्या एका एसयुव्ही कारने फिल्टरपाडा येथे ४ वर्षाच्या एका लहान मुलाला उडवल्याची घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. अरहान रमजान खान (०४) असे मुलाचे नाव असून, रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, फिल्टरपाडा बेस्टनगर येथे राहणाऱ्या अरहानचे घर हे रस्त्यापासून काहीच अंतरावर आहे. दुपारी तो घराबाहेरील भागात खेळत होता. रॉयल पाल्म्स भागातून भरधाव वेगात निघालेली कार एमएच ०४ जीझेड ६९७४ या एसयुव्ही कारने त्याला जोरदार धडक दिली.
भरधाव वाहनाच्या धक्याने मुलगा रस्त्यावर जावून पडला. जखमी मुलाला त्वरित हिरानंदानी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
‘माझा मुलगा जवळच असणाऱ्या गोळ्या बिस्किटांच्या दुकानात खावू आणायला गेला होता. तिथून निघताना भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्याला चिरडले. मुलाला गाडीत टाकून पळत असताना आमच्या येथील एक वृद्ध गृहस्थाने (चाचा) पाहून माझ्या भावाला याची माहिती दिली. ज्यानंतर त्याने धावत जावून गाडीला अडवून दवाखान्यात आणले’ असे मुलाचे वडील रमजान खान यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
‘आमचे पथक रुग्णालयात आणि घटनास्थळी गेले असून, जवाबाच्या आधारावर योग्य कलमांतर्गत गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करू’, असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
‘गाडी चालक हा मोठा व्यक्ती असू शकतो, त्याने त्वरित बाउन्सरना बोलावून जमा लोकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत तेथून पलायन केले होते.’ पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी हिच आमची मागणी असल्याचे मुलाच्या नातेवाईकांनी यावेळी बोलताना सांगितले.
No comments yet.