पवईतील ज्वेलरचे अपहरण करणाऱ्या ७ जणांना क्राईम ब्रांचने ठोकल्या बेड्या

वईतील ज्वेलर जितेश परमार व दुकानातील कामगार प्रकाश सिंग यांचे मिलिंदनगर येथून अपहरण करून त्यांना मारहाण करून १.८० लाखाची लुट करून ठाण्यात सोडून पसार झालेल्या ७ अपहरणकर्त्यांना अखेर काल क्राईम ब्रांच युनिट ११ ने अटक केली आहे.

अन्वर सय्यद (२६), युनुस सय्यद उर्फ शेरू (२१), रेहान शेख (३६), निझाम मकरानी (२०), समीर शेख (२८), तबरेज अन्सारी (२०) आणि जितेंद्र सिंग (२७) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

ज्वेलरी दुकान लुटायचे किंवा खंडणी वसूल करायची या उद्देशाने त्यांनी ज्वेलरचे अपहरण केले असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. अटक सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, अपहरण करण्यापूर्वी महिनाभरापासून ते परमारवर नजर ठेवून होते.

पवईतील आयआयटी, चैतन्यनगरमध्ये राहणारे जितेश परमार यांचे मिलिंदनगर येथे लक्ष्मी ज्वेलर्स नामक सोन्याचे दुकान आहे. मंगळवारी १३ जून रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून दुकानातील कामगार प्रकाश सिंग याच्या सोबत दुचाकीवरून घरी परतत असताना जेव्हीएलआरवर मिलिंदनगर येथे एक भरधाव कार त्यांच्या गाडीसमोर येवून थांबली, तोंडाला रुमाल बांधलेले व हातात शस्त्रे असलेले ५ तरुण त्या गाडीतून उतरले आणि हत्याराच्या धाकाने त्यांनी परमार आणि सिंग यांना जबरदस्ती गाडीत कोंबून अपहरण केले.

दुकान लुटायच्या इराद्याने अपहरण केलेल्या परमार आणि सिंग यांना मारहाण करत अपहरणकर्त्यांनी दुकानाची चावी आणि लॉकरच्या पासवर्डची त्यांच्याकडे मागणी केली. अंगझडतीत चावी दोघांच्याकडेही नसल्याने आणि परमारने धक्काबुकीत चावी रोडवरच पडली असावी असे सांगितल्याने अखेर त्यांनी परमारला सोडायच्या बदल्यात त्याच्या परिवाराकडे खंडणी मागण्याचा प्लान गाडीतच बनवला. मात्र परमार घरी परतले नसल्याची आणि त्यांचा फोन लागत नसल्याची तक्रार दिल्याने पोलीस परमारच्या घरी पोहचल्याची माहिती लगेचच त्यांच्या इतर साथीदारांनी दिल्याने अखेर खंडणीचा प्लान सुद्धा बासनात गुंडाळला गेला. अखेर परमार आणि सिंग यांच्याजवळील चैन, ब्रेसलेट, अंगठी, मोबाईल आणि कॅश अशी १.८० लाखाच्या वस्तू काढून घेत घोडबंदर रोडवरील कृष्णा धाब्यावर दोघांना सोडून अपहरणकर्त्यांनी तेथून पलायन केले होते.

सुटका झाल्यानंतर परमार आणि सिंग यांनी पवई पोलिस ठाण्यात धाव घेवून घडलेली सर्व हकीकत कथन केल्यानंतर पवई पोलिसांसह क्राईम ब्रांचने समांतर तपास सुरु केला होता.

जवळपास डझनभर सिसिटीव्ही आणि हजारो कॉल डाटा तपासल्यावर पोलिसांना या अपहरणाचे काही धागेदोरे हाती लागले होते, त्याच आधारावर अतिरिक्त पोलीस आयुक्त के एम एम प्रसन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय शास्त्री, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव व पोलीस निरीक्षक आनंद रावराणे आणि टिम यांनी तपास केला.

परमार यांचे अपहरण करण्यापूर्वी आरोपींनी आळीपाळीने परमार यांच्यावर पाळत ठेवली होती. यातील रेहान हा त्याच परिसरात भाजी विक्रीचे काम करतो. तर शेख याचा टूअर्स अंड ट्राव्हल्सचा व्यवसाय असून त्याच्याच दोन कारचा त्यांनी या अपहरणाच्या गुन्ह्यात वापर केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

भादवि कलम ३४२, ३६४ (ब), ३९५, ३९७ आणि ५०६ (२) नुसार गुन्हा नोंद करत पोलीस सातही अटक आरोपींकडे अधिक तपास करत आहेत.

 

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!