पवईतील आयआयटी येथे खरेदीसाठी आलेल्या एका महिलेला सीबीआय ऑफिसर असल्याचे सांगून महिलेचे ८ तोळ्याचे दागिने पळवल्याची घटना आज (०५ एप्रिल २०१९) दुपारी १ वाजता घडली. पवई पोलिसांनी याबाबत दोन अज्ञात इसमांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करून, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला
आहे.
याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलेनिअम टॉवर येथे राहणाऱ्या अर्चना विजय जोशी (७२) या पवई, आयआयटी भागात खरेदी करून परतत असताना, एका इसमाने त्यांना थांबवून साहेब बोलावत आहेत असे बोलून जैन मंदिर रोडकडे त्यांना नेले. तिथे गाड्यांच्या पाठीमागे उभ्या असणाऱ्या दुसऱ्या इसमाने आपले नाव मोहन शर्मा आहे असे सांगून सीबीआय ऑफिसर असल्याची आपली ओळख करून दिली.
सध्या सोनसाखळी चोरी आणि लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा. असे त्यांनी मला सांगितले. असे जोशी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले.
‘त्यांच्या हातातील बांगड्या निघत नसल्याने आरोपी इसमांनी तेल लावून त्या हातातून काढण्यास मदत करत त्या सुरक्षित त्यांच्या पिशवीत ठेवत असल्याचे दाखवले. ते दोघे तिथून निघून जाताच जेव्हा जोशी यांनी पिशवीत पाहिले असता त्यांच्या ८ तोळे वजनाच्या बांगड्या गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले’ असे पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितले.
‘या भागात अनेक मोठमोठ्या गाड्या उभ्या केल्या जातात. जवळच असणाऱ्या एका गोदामात सतत माल उतरवला जात असतो त्याचे ट्रक रस्त्यावरच उभे असतात. याबाबत मी वाहतूक विभागाला तक्रारही केली आहे, मात्र काहीच कारवाई केली जात नाही. आजच्या घटनेत येथे उभ्या वाहनांचा फायदा घेतच भामट्यांनी त्या वृद्ध महिलेला लुटले आहे. अजूनही गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी त्वरित योग्य त्या उपाययोजना कराव्यात.’ असे याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम कांबळे यांनी सांगितले.
‘मोठ्या हातचलाखीने त्या इसमांनी सोन्याच्या वस्तू गायब केल्या आहेत. आम्ही परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीचे फुटेज मागवले आहे. सदर इसम हे पिडीत महिलेचा आधीपासूनच पाठलाग करत होते का? की सावजाच्या शोधात तिथे घात लावून बसले होते, या बाबत आम्ही माहिती मिळवत आहोत’ असेही याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
No comments yet.