पवई | प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय संस्था तफिसातर्फे जगभर संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘वर्ल्ड वॉकिंग डे’ या जागतिक उपक्रमाचा एक भाग म्हणून, ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोर्टस ॲड फिटनेस फॉर ऑलच्यावतीने, उद्या (रविवारी) दि. १८ ऑक्टोबरला सकाळी ७ ते ९ या वेळेत पवईतील हेरिटेज गार्डन हिरानंदानी येथे ‘वर्ल्ड वॉकिंग डे’ आणि ‘हेल्दी ब्रिदिंग डे’चे आयोजन केले गेले आहे. हिरानंदानी ते आयआयटी मार्केट आणि परत असा हा मार्ग असणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या उपक्रमात सहभागी होणार असून, जास्तीत जास्त पवईकरांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, रोगमुक्त भारत जोपासणे, देशातील गरिब व गरजू, विविध आजारांनी पीडित असलेल्या नागरिकांना रोगांपासून मुक्तता मिळावी या उद्देशाने, चालण्याच्या कसरतीसोबत योग्य पध्दतीने श्वासोच्छवास कसा करावा? याचे प्रशिक्षण यावेळी जाणकारांकडून दिले जाईल अशी माहिती ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोर्टस ॲड फिटनेस फॉर ऑल मुंबईचे सचिव रमेश जाधव यांनी आवर्तन पवईशी बोलताना दिली.
दैनंदिन जीवनात चालण्याला खूप महत्व आहे, आपले आरोग्य उत्तम राखण्यास चालणे हा व्यायाम अत्यावश्यक आहे याचे महत्व जगभर पटवून देण्यासाठी तफिसा या संस्थेच्यावतीने १९९१ पासून ऑक्टोबर महिना हा ‘वर्ल्ड वॉकिंग डे’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. आज २५ वर्षानंतर मोठ्या संख्येने लोक जगभर रस्त्यावर उतरून या उपक्रमात सहभाग घेऊन आपले आरोग्य उत्तम राखण्यात हातभार लावत आहेत. गेल्या वर्षी १.२० करोड लोकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला होता. या वर्षी पवईमध्ये प्रथम या उपक्रमाचे आयोजन केले गेले आहे. तेव्हा आपले आरोग्य निरोगी आणि सुंदर बनवण्यास या उपक्रमात नक्की भाग घ्या, असे आवाहन ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोर्टस ॲड फिटनेस फॉर ऑलच्यावतीने पवईकरांना करण्यात आले आहे.
No comments yet.