पवईतील सर्वात जुन्या असणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये सोमवार, २१ जून रोजी ७वा ‘जागतिक योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन कार्यक्रमात सहभाग नोंदवत योगाचे धडे गिरवले. शिक्षक आणि योगा इन्स्ट्रक्टर कोमलम सुनील आणि आर्ट ऑफ लिविंगच्या योगा इन्स्ट्रक्टर निवेदिता घोशाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
योग हा ५००० वर्षापूर्वीचा शारीरिक आणि मानसिक अभ्यास आहे. शरीर आणि मन दोन्ही निरोगी, तणावमुक्त राखण्याचे काम योग करते. आज संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. भारताने घेतलेल्या पुढाकारामुळे २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात असून, करोना संकटात अनेक देशांनी याला महत्व दिले आहे. भारतात राजधानी दिल्लीपासून ते लडाखमध्ये १८ हजार फूट उंचीपर्यंत योग साजरा केला गेला.
या दिवसाचे औचित्य साधत पवईमध्ये स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये, रहिवाशी सोसायटी, ज्येष्ठ नागरिक गृप यांनी योग दिवस साजरा केला. पवईतील पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये योगा इन्स्ट्रक्टर कोमलम सुनील आणि आर्ट ऑफ लिविंगच्या योगा इन्स्ट्रक्टर निवेदिता घोशाल यांच्या मार्गदर्शनाखाली वर्च्युअल योग दिन साजरा करण्यात आला.
वर्च्युअल माध्यमातून विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात यात सहभाग घेतला. योगा इन्स्ट्रक्टरनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून देतानाच विविध आसनांबद्दल मार्गदर्शन करत त्यांच्याकडून योगाचे धडे गिरवून घेतले.
“योगाचे आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे. पाठीमागील अनेक वर्षापासून आमच्या शाळेत योग दिन साजरा केला जात आहे. शिवाय आमच्या विद्यार्थ्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून आम्ही योगाचा सहभाग आमच्या शिक्षणात सुद्धा केला आहे,” असे याबाबत बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका शर्ली उदयकुमार यांनी सांगितले.
No comments yet.