२९. ४४ कोटी खर्चून आणि पुरेसा वेळ देवून देखील पुलाचे काम रखडल्याने त्रस्त नागरिकांच्या तक्रारीवरून पवईमध्ये शिवसैनिकांनी कंत्राटदाराचे ऑफिस तोडले. पाठीमागील ३ वर्षापासून सातत्याने रखडत चालेल्या या कामामुळे शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक होत त्यांनी हे कंत्राटदाराचे कार्यालय आणि जेसीबी तोडले.
२०२१ साली सुरु झालेले मारवा पुलाचे काम कासव गतीने सुरु असून, ३ वर्ष उलटून गेली तरी अजून पूर्ण झालेले नाही. पवईवरून मरोळ, एमआयडीसीकडे जाण्यासाठी मारवा पुलामार्गे शोर्टकट आहे. अवघ्या ५ मिनिटात या मार्गाने संबंधित ठिकाणी पोहचता येते. मात्र गेल्या ३ वर्षापासून सुरु असणाऱ्या कामासाठी हा मार्ग बंद केल्याने प्रवाशांना जवळपास तासभर खर्च करत वाहतूक कोंडीतून साकीनाका मार्गे जवळपास ७ किलोमीटर अधिकच अंतर पार करून प्रवास करावा लागतो आहे.
वारंवार निधी वाढवून देवून देखील पुलाचे काम पूर्ण झालेले नसून, कासव गतीने सुरु असणाऱ्या या कामाच्या विरोधात संतप्त शिवसैनिकांनी विधानसभा प्रमुख अशोक माटेकर आणि माजी नगरसेविका अश्विनी माटेकर यांच्या नेतृत्वात ५ जूनला मोर्चा काढला. पुलाचे काम अजूनही बरेच बाकी असल्याचे पाहून शिवसैनिकांना राग अनावर झाल्याने त्यांनी कंत्राटदार यांचे कार्यालय फोडले. तसेच या भागात उभ्या कंत्राटदाराच्या जेसीबीची देखील या संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड केली.
प्रस्तावानुसार, बीएमसीने ऑक्टोबर २०१८ मध्ये पुलाच्या विस्ताराचा विचार सुरू केला होता आणि ११ जून २०२१ रोजी दुरुस्तीदरम्यान पुलाच्या भिंतीचा काही भाग कोसळला आणि पुलाला तडे गेले. या घटनेनंतर बीएमसीने पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला. त्याच कंत्राटदाराकडून निविदा न काढता काम केले जाईल, असेही ठरले. या पुलाच्या विस्तारीकरणासाठी सुरुवातीला सुमारे १४.२२ कोटी रुपये खर्च आला होता. जेव्हा बीएमसीने पुलाच्या पुनर्बांधणीसाठी त्याच कंत्राटदाराचा वापर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा द्यावी लागणारी रक्कम २६.०७ कोटी रुपये करण्यात आली.
काम सुरु असताना खोदकाम करताना मारवा पुलाजवळील भूमिगत तानसा पाइपलाइनची स्थिती विसंगत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पुलाची लांबी ३.१० मीटरने वाढवण्यात आली. तसेच, पुलाच्या पश्चिमेकडील अप्रोच रोडलगत, नियोजित जागेवर जलविभागाच्या पाण्याच्या लाईन्स आणि टाटा आणि अदानी यांच्या उच्च दाबाच्या विद्युत लाईन्सचे मोठे जाळे होते. या ठिकाणी रिटेनिंग वॉलच्या पायासाठी पाईल फाउंडेशन प्रस्तावित करत पालिकेतर्फे मारवा पुलाच्या कामाच्या खर्चात वाढ मंजूर करण्याचा निर्णय घेतला होता.
३.३७ कोटी रुपयांच्या खर्च वाढीच्या प्रस्तावाला मान्यता देत डिसेंबर २०२३ चा कालावधी वाढवून मे २०२४ पर्यंत कामासाठी मुदतवाढ मंजूर केली होती.
“गेली ३ वर्ष संत गतीने या पुलाचे काम सुरु असून, रस्ता बंद केल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आम्ही सतत पालिकेला आणि रस्ते विभागाला पत्रव्यवहार केले आहेत. डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. ५ महिन्यांचा कालावधी वाढवून देवून देखील ३१ मे पर्यंत या पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. आता पावसाळा तोंडावर आला असून, नागरिकांच्या त्रासात या पुलामुळे आणखीनच भर पडत आहे. आजचे आमचे आंदोलन हे पालिका आणि रस्ते विभागाला इशारा आहे, जर लवकरात लवकर हे काम पूर्ण झाले नाही तर पुढच्या वेळेस तुमच्या कार्यालयात घुसून आम्ही आंदोलन करू,” असे यावेळी बोलताना माटेकर यांनी सांगितले.
No comments yet.