गुन्हेगारी, गैरकृत्य रोखण्यासाठी पोलिसांचा अनोखा प्रयोग
@प्रमोद चव्हाण
मुंबईची कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षित ठेवणाऱ्या मुंबई पोलिसांना आपण विविध वाहनातून गस्त घालताना पाहिले आहे. मात्र यामुळे गुन्हेगार कदाचित दूर राहतीलही पण जनतेशी असणारा जनसंपर्क बनेलच असे नाही. म्हनूणच पवई पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना रोखण्यासाठी आणि पवईकरांशी आपला जनसंपर्क वाढवण्यासाठी पायी गस्त घालण्याचा निर्णय घेत आयआयटी भागातून याचा शुभारंभ केला आहे.
सोनसाखळी चोरी, खून, चोरी, दरोडे, चोरटी वाहतूक आणि इतर गैरप्रकार हे आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहराला नवखे नाही. कुणी विश्वास संपादन करून तर कुणी रात्रीच्या अंधाराचा, निर्जन रोडचा फायदा घेऊन गुन्हे करतात. अशात गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठा दुवा ठरतो तो पोलीस आणि नागरिक यांच्यातील असणारे मैत्रीचे नाते आणि संवाद. हिच गोष्ट लक्षात घेत पवई पोलिसांनी पायी गस्त घालत पवईकरांशी संवाद साधणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याचा एक नवा प्रयोग सुरु केला आहे.
संध्याकाळी मार्केटमध्ये असणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन अनेक गुन्हेगार सोनसाखळी चोरी, पाकीट चोरी, चोरी, छेडछाड असे गुन्हे करत असतात. म्हणूनच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक (कर्तव्यावर असणारे) यांच्यासह ज्या विभागात गस्त घालायची असेल त्या विभागातील बिट अधिकारी आणि शिपाई तेथील मार्केट भागात पायी गस्त घालत जनता आणि दुकानदार यांच्याशी संपर्क साधत त्यांची विचारपूस करताना पहावयास मिळत आहेत.
‘आयआयटी मार्केट भागात अनेकवेळा चोरीचे, पाकीट चोरीचे प्रकार घडलेले आहेत. मात्र या भागात पोलिसांनी गस्त घालायला सुरुवात केल्यापासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी येथून पळ काढलेला आहे. त्यामुळे धंदा करणारा आणि खरेदीला आलेला प्रत्येकजण स्वतःला सुरक्षित समजू लागला आहे’ असे याबाबत बोलताना काही स्थानिक नागरिकांनी सांगितले.
पवई पोलिसांच्या गस्त पथकाने एवढ्यावरच न-थांबता नशेखोरीला आळा घालण्यासाठी येथील उद्याने, पडक्या इमारती आणि निर्जन स्थळांवरही गस्त घालत त्यांच्या तपासण्या सुरु केल्यामुळे नशेखोरांच्या मुसक्या आवळण्यात सुद्धा पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.
‘पोलीस हा जनतेचा मित्र असतो आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तो सदासर्वदा हजर आहे, हे जनतेपर्यंत पोहचणे महत्वाचे आहे. बिट मार्शल, पोलीस व्हॅन या परिसरात दिवस रात्र सतत गस्त घालत असतात, मात्र ते प्रत्येक गल्ली बोळात पोहचू शकतीलच असे नाही. म्हणूनच पोलिसांचा जनतेशी असणारा संपर्क हा वाढावा आणि गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून आम्ही हा पायी गस्तीचा निर्णय घेतला आहे’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.
केवळ आयआयटी भागातच नव्हे तर पवई पोलिसांच्या अखत्यारीत येणाऱ्या तुंगा गाव, फिल्टरपाडा, मरोळ, चांदिवली, मिलिंद नगर, हिरानंदानी, साकीविहार रोड या भागात पोलिस पायी गस्त घालताना आढळून येत आहेत.
गस्तीची रचना
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक (बिट अधिकारी), पोलीस उपनिरीक्षक (बिट अधिकारी), बिट पोलीस हवालदार आणि शिपाई परिसरात गस्त घालताना आढळून येत आहेत.
पवई पोलिसांकडून नेहमीच असे आगळे वेगळे उपक्रम राबवले जात असतात. जानेवारी २०१६ मध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला नशेखोरांनी घरी परतणाऱ्या काही तरुणांवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर पवई पोलिसांनी चैतन्यनगर येथे गुन्हेगारी रोखण्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यानंतर पोलीस आणि नागरिक यांच्या पथक बनवून नशेखोरांची धरपकड करण्यात आली होती. त्यानंतर नशेखोरांकडून रात्रीच्या वेळेस होणारे हैदोस संपुष्टात आले होते.
२६/११ हल्ल्यानंतर हत्यारबंद पोलीस गस्तीसह पवईतील अतिमहत्वाच्या ठिकाणी बँकर्समध्ये हत्यारबंद पोलीस तैनात करण्यात आले होते. २०१२ साली सोनसाखळी चोरी आणि गंभीर गुन्हे रोखण्यासाठी पवई पोलिसांनी पायी सशस्त्र पोलीस गस्त चालू केली होती. ज्यानंतर परिसरात गुन्हेगारीला आळा बसला होता.
No comments yet.