पवईकरांचे आपले हक्काचे माध्यम असणाऱ्या ‘आवर्तन पवई‘चा दणका पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. आयआयटी पवई येथील देवीनगर येथे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या कित्येक वर्षापासून कचऱ्याचा पडलेला ढिगारा आवर्तन पवईच्या बातमी आणि पाठपुराव्यानंतर अखेर कालपासून पालिकेने उचलायला सुरुवात केली आहे. लवकरच संपूर्ण साफसफाई करून औषध फवारणी सुद्धा या भागात पालिकेतर्फे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईचे हृदय म्हणून ओळख बनत असलेल्या पवईमध्ये एकीकडे उच्चभ्रू वस्त्यांमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त सुविधा देण्याकडे लोकप्रतिनिधीचा कल असताना या पवईमधील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे मात्र याच लोकप्रतिनिधीनी कानाडोळा केल्याचे समोर येत आहे. आयआयटी येथील देवीनगर भाग सुद्धा यापैकी एक आहे. येथील रहिवाशांना स्वातंत्र्याच्या ७१ वर्षानंतर सुद्धा आजतागायत मुलभूत सुविधा देखील मिळू शकल्या नाहीत.
विशेष म्हणजे या परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर येथील चैतन्यनगर, इंदिरानगर, देवीनगर, गरीबनगर या भागातून निघणारा कचरा टाकला जात होता. याबाबत त्यांनी लोक-प्रतिनिधींसह पालिका प्रशासन यांना तक्रारी करूनही त्यांनी मात्र याकडे कानाडोळा केला होता.
आवर्तन पवईने याबाबत “देवीनगरकरांचा रस्ता कचऱ्यातून” या मथळ्याखाली बातमी करत पालिका प्रशासनाचे याकडे लक्ष वेधत त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता. ज्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहय्याने कचरा जमा करून त्याला उचलणे सुरु केले आहे.
यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी आवर्तन पवई प्रतिनिधींशी बोलताना सांगितले कि, लवकरच ते संपूर्ण कचरा उचलणार असून, परिसरात औषध फवारणी सुद्धा करणार आहेत.
No comments yet.