सध्या सुरु असणाऱ्या विणीच्या हंगामाची दख़ल घेत पक्ष्यांच्या घरटी संरक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) पवई तलावाच्या साफसफाईला १० जूनपर्यंत विराम दिला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (BNHS) सुरू असलेल्या स्वच्छता उपक्रमांचा पक्ष्यांवर होणाऱ्या परिणामाबाबत उपस्थित केलेल्या चिंतेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पालिकेने ८ मार्च रोजी तलाव स्वच्छतेचा प्रकल्प सुरू केला असून, ८.४ कोटी रुपये खर्चून जलपर्णी आणि इतर वनस्पती काढून टाकण्यासाठी हार्वेस्टर यंत्राच्या मदतीने काम सुरु केले आहे. आतापर्यंत, जवळपास ५५% काम पूर्ण झाले असून, तलावातून १३,९२० टन वनस्पती साफ करण्यात आली आहे.
जलपर्णी ही एक आक्रमक प्रजाती असून, यामुळे पाण्यातील मासे, मगरी आणि इतर सजीवांना धोका असल्याने ते काढून टाकणे आवश्यक आहे. मात्र पालिका आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी नुकत्याच दिलेल्या भेटी दरम्यान निरीक्षणांमध्ये स्टिल्ट्स, एग्रेट्स, जॅकनास, स्वॅम्फेन, लॅपविंग्स आणि २० पेक्षा अधिक विविध पक्ष्यांच्या प्रजातींची उपस्थिती दिसून आली आहे.
पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक यांच्या निरीक्षणानुसार दरवर्षी १० जूनपर्यंतचा काळ हा जलचर पक्षांचा प्रजोत्पादन किंवा विणीचा हंगाम असतो. स्वच्छतेच्या कामामुळे पक्षी आणि मगरी यांनी घातलेली अंडी उबवण्यास त्यांना अडसर निर्माण होत असल्याने या काळात स्वच्छतेच्या कामाला थांबवण्याची विनंती करण्यात आली आहे. आयआयटी मुंबईच्या जवळील तलावाच्या भागात या पक्षांची घरटी, अधिवास असल्याने या भागातील जलपर्णी काढण्याचे काम १० जूनपर्यंत तात्पुरते थांबवण्यात आले आहे. विणीचा हंगाम संपताच जलपर्णी काढण्याचे काम पुन्हा सुरु करण्यात येणार आहे
No comments yet.