नशेच्या आहारी जावून आपल्या आईला दररोज मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाचा त्याच्याच छोट्या भावाने खून केल्याची घटना साकीनाका येथे घडली आहे. ब्रिजभान संतू लोध असे मृत तरुणाचे नाव असून, साकीनाका पोलिसांनी त्याचा छोटा भाऊ सूर्यभान ऊर्फ मोनू (२६) याला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या काजूपाडा येथे सोनू आणि मोनू हे दोघे आपल्या आईसोबत राहतात. सोनू हा दररोज संध्याकाळी दारू पिऊन आईशी वादविवाद घालत तिला मारहाण करत असे. बुधवारी सुद्धा दारू पिऊन घरी आल्यावर त्याने आईला मारहाण करायला सुरुवात केली, त्याचवेळी घरी परतलेल्या मोनूने हे पाहताच त्याचा राग अनावर झाल्याने त्याने सोनूला बेदम चोप दिला.
नशेत असल्याने मारहाणीत सोनू खाली पडल्याने बेशुद्ध झाला. त्याला त्वरित घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
याबाबत साकीनाका पोलिसांना माहिती मिळताच, खुनाचा गुन्हा दाखल करून मोनुला अटक करण्यात आली.
No comments yet.