पवईतील गणेशनगर (पंचकुटिर) येथे गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या महिंद्रा झायलो कारला आग लागून, जळून खाक झाल्याची घटना काल (मंगळवार, २१ नोव्हेंबर) रात्री घडली. तर दुसऱ्या घटनेत रविवारी रात्री गांधीनगरच्याच दिशेने जाणारी स्विफ्ट कार आयआयटी मार्केटजवळ जळाल्याची घटना घडली. दोन्ही घटनेत आगीचे नक्की कारण समजू शकले नसून, वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
काल, मंगळवारी रात्री ११.४० वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड़वरून पवईकडून – गांधीनगरच्या दिशेने जात असताना पंचकुटिर येथे महिंद्रा झायलो कारच्या (एम एच ०१ बिके ६७१५) समोरील भागातून धूर निघत असल्याचे त्याचा चालक संकेत सतीश खैरे याला जाणवले. काही क्षणातच गाडीच्या पुढील भागाने आग पकडत संपूर्ण गाडीला आपल्या कवेत घेतले.
गाडीने पेट घेतलेला पाहताच आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी धाव घेत माती, पाणी टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. भर रस्त्यातच गाडी जळत असल्यामुळे आग नियंत्रण येईपर्यंत वाहतूक थांबवण्यात आली होती. चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
दुसऱ्या घटनेत आपल्या एका महिला सहकाऱ्याला घेऊन जात असताना आयआयटी मार्केट गेटजवळ मुलुंडच्या रहिवाशाची स्विफ्ट कार पेटल्याची घटना रविवारी रात्री घडली.
दोन्ही घटनेत आगीचे नक्की कारण समजू शकले नसून, वातावरणातील बदल पाहता वायर गरम झाल्याने शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असल्याचे पवई पोलिसांनी यावेळी बोलताना सांगितले.
No comments yet.