जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरून जाणाऱ्या दोन गाड्यांना आग लागल्याच्या घटना बुधवारी संध्याकाळी पवई परिसरात घडल्या. दोन वेगवेगळ्या घटनेत एक कार आणि एक मोटारसायकल आगीच्या भक्षस्थानी आल्या.
यासंदर्भात पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सारस्वत बँकेत मॅनेजर पदावर काम करणारे दादर येथील आपले काम संपवून स्विफ्ट मोटार कार क्रमांक एमएच ४३ बिई ९५२० मधून आपल्या डोंबिवली येथे घरी जाण्यासाठी जेविएलआर मार्गे प्रवास करत होते. पवईतील पवई विहार बस स्थानक भागात संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गाडी येताच गाडीच्या पुढील भागातून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले.
“गाडीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच गाडी बाजूला घेत गाडीतून ते आपल्या चालकासह गाडीच्या बाहेर निघताच गाडीने पेट घेतला.” असे पवई पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “सुदैवाने दोघेही वेळेतच बाहेर निघाल्याने सुखुरूप असून, या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने अग्निशमन दल पोहचण्यापूर्वीच कार जळून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
ही घटना घडल्याच्या काही मिनिटातच पवई प्लाझा भागात एका मोटारसायकलला आग लागल्याची घटना देखील घडली. या घटनेत मोटारसायकल चालकाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नसून, मोटारसायकल जळून मोठे नुकसान झाले आहे.
No comments yet.