पवई आणि आसपासच्या परिसरातून चार चाकी वाहने चोरी करणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. किशोर वानखेडे (बदलेले नाव) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याचा टूअर्स अंड ट्राव्हल्सचा व्यवसाय असून, त्यासाठी तो या चोरीच्या गाड्या वापरत होता. आतापर्यंत पवई पोलिसांनी त्याच्याकडून इनोव्हा, सुमो आणि स्विफ्ट डीजायर अशा गाड्या हस्तगत केल्या आहेत. किशोर हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी सुद्धा आहे.
वाहन चोरीचे एक मोठे रकेट देशभर कार्यरत आहे. २०१४ सालच्या वाहन चोरीच्या आकडेवारीनुसार २०११ साली १.५१ लाख, २०१२ साली १.५४ लाख आणि २०१३ साली १.६५ लाख वाहनांची चोरींची नोंद महाराष्ट्रात झाली होती. या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक वाहन चोरीच्या बाबतीत लागतो. तर मुंबईतून दररोज ९ – ११ गाड्या चोरीचे गुन्हे घडत असतात. मुंबईतून २०११ साली ४७०२ गाड्या, २०१२ साली ४०७५ तर २०१३ साली ३७८९ वाहनांच्या चोरीचे गुन्ह्यांची नोंद झाली होती. वाहन चोरी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून सुद्धा असे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असल्याने मुंबई पोलिसांसमोर याला रोखण्याचा एक मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
पवईतून एक इनोव्हा कार चोरी झाल्याची तक्रार नोंद झाली होती. ज्याचा तपास करत असताना पवई पोलिसांना पवईमध्ये टूअर्स अंड ट्राव्हल्सचा व्यवसाय करणारा एक व्यक्ती चारचाकी वाहने चोरी करून आपल्या व्यवसायासाठी वापरत असल्याची खबऱ्यांने माहिती दिली होती. सपोनि सचिन वाघ आणि पथकाने व्यवसायीकावर नजर ठेवून त्याच्या वाहनांबद्दल माहिती मिळवली असता तो चोरीची वाहने वापरत असल्याचे समोर येताच त्यांनी त्याला पवईमधून अटक केली आहे.
“किशोर चोरीचे काम करणाऱ्या लोकांना पैसे देवून वाहने चोरी करायला लावत असे; नंतर त्या वाहनांचे नंबर बदलून तो आपल्या व्यवसायासाठी वापरत होता. पवईमधून इनोव्हा कार चोरी करण्याचे काम त्याने तिस हजार रुपये देवून फिल्टरपाडा येथील एका पवई पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद असणाऱ्या व्यक्तीला दिले होते.” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
“इनोव्हा गाडीला आपल्या जवळ असणाऱ्या दुसऱ्या गाडीचा नंबर लावून त्याने वापरायला सुरवात केली होती. त्याच्याकडून आम्ही पवई पोलीस ठाणे हद्दीतील चोरी झालेली इनोव्हा कारसह साकीनाका येथून चोरी केलेली स्विफ्ट डीजायर आणि एक सुमो अशा ३ गाड्या हस्तगत केल्या आहेत.” असे याबाबत बोलताना तपासी अधिकारी सचिन वाघ यांनी सांगितले.
पवई पोलिसांनी याबाबत भादवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद करून किशोरला अटक केली असून, त्याचे इतर साथीदार आणि त्याने अजून किती गाड्या चोरी केल्या आहेत याचा पवई पोलीस शोध घेत आहेत.
No comments yet.