जेष्ठ पत्रकार जेडे यांच्या हत्येप्रकरणी दोषमुक्ती मिळालेल्या जीग्ना व्होरा आणि पोल्सन जोसफ यांच्या दोषमुक्तीला सीबीआयकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
२०११ साली ११ जूनला दुपारी जेष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे (जेडे) यांची पवई डी मार्ट सर्कलजवळ (आताचे जेडे सर्कल) गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या सांगण्यावरून हत्या करण्यात आल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला होता. या गुन्ह्यात गुन्हे शाखेने अभिजित शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेडगे, मंगेश आगवणे, विनोद असरानी, दिपक सिसोदिया, सतीश कालिया, पोल्सन जोसेफ आणि जीग्ना व्होरा यांना अटक करून आरोपपत्र दाखल केले होते.
जेडे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार मानला जाणारा छोटा राजन हा सीबीआयच्या ताब्यात असल्याने हे प्रकरण सुद्धा तपासासाठी सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले. विशेष मोक्का न्यायालयात हा खटला चालवण्यात आला. खटल्याच्या अंतिम निकाल सुनावताना पुराव्याअभावी न्यायालयाने जीग्ना व्होरा आणि पोल्सन जोसेफ यांना दोषमुक्त केले होते.
राजनच्या सांगण्यावरून पोल्सनच्या मदतीने मारेकऱ्याना २० परदेशी सिमकार्ड पुरवण्यात आले होते. तर जेडे यांची माहिती पुरवण्याच्या आरोप असलेल्या जीग्ना व्होरा आणि राजन यांच्यातील संभाषणाचा दाखला देत सीबीआयतर्फे त्यांच्या दोषमुक्तीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
No comments yet.