जेव्हीएलआरवर अपघात सत्र सुरूच; अपघात, वाहतूक कोंडीमुळे चाकरमानी संतप्त
आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास गांधीनगर उड्डाणपुलावर सिमेंट मिक्सर पलटी झाल्याची घटना घडली. पवईकडून पूर्व धृतगती मार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर हा कंटेनर पलटी होत रस्त्यावर आडवा झाल्याने उड्डाणपुलावरील वाहतूक रोखण्यात आली होती. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या मदतीने मिक्सर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेत क्लिनर किरकोळ जखमी झाला असून, चालकाने घटना स्थळावरून पळ काढला.
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर मिलिंदनगरजवळ येथे बुधवारी मेट्रो ३’च्या कामासाठी टीबीएम मशिन घेवून जाणारा एक भलामोठा ट्रेलर खड्डयात अडकल्याने तब्बल ९ तास जेव्हीएलआरवरील वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेमुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाल्याचे चित्र धूसर झाले नाही कि शुक्रवारी पहाटे ३ वाजता पूर्व दृतगती मार्गावर सुरु असणाऱ्या मेट्रोच्या कामासाठी सिमेंट घेऊन जाणारा एक सिमेंट मिक्सर गांधीनगर उड्डाणपुलावर घसरल्याची घटना घडली.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे सिमेंट मिक्सर क्रमांक एमएच १४ जि डी ४३२२ हा सिपझ येथून सिमेंट भरून पूर्व दृतगती मार्गावर सुरु असणाऱ्या मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी घेऊन चालला होता. सतत सुरु असणाऱ्या संतधार पावसामुळे जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर ओलसरपणा आणि निसरडा झाला होता. “या निसरड्या रस्त्यावरून जाताना मिक्सर चालकाचा ताबा सुटल्याने मिक्सर पलटी होत रस्त्यावर आडवा झाला. सुदैवाने कंटेनर चालक आणि क्लिनर वेळीच बाहेर पडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर मिक्सर चालक शकील अहमद याने पळ काढला होता. किरकोळ जखमी झालेल्या क्लिनर शपिहूल्ला अन्सारी याच्यावर स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.” असे याबाबत बोलताना वाहतूक पोलिसांनी सांगितले.
पहाटे घडलेल्या अपघातातील मिक्सर चाकरमान्यांच्या प्रवासाच्या आधीच उचलला गेल्यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीत अडकून पडण्याच्या समस्येपासून सुटका झाली. मात्र जेव्हीएलआरवर सुरु असणाऱ्या मेट्रोच्या कामामुळे वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे आधीच वाहतूक कोंडीत असणाऱ्या मार्गावर आणखी समस्या वाढत असल्याने प्रशासनाने यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी मुंबईकरांकडून जोर धरत आहे.
दोन क्रेनच्या साहय्याने रस्त्यावर आडवा झालेला हा कंटेनर हटवण्यात जवळपास ५ तासानंतर यश आल्यानंतर रस्त्यावर पडलेले ऑईल आणि सिमेंट अग्निशमन दलाकडून साफ करण्यात आल्यानंतर उड्डाणपुलाच्या मार्गे वाहतूक सुरु करण्यात आली. सकाळपासूनच वाहतूक पूर्ववत झाली असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.
No comments yet.