मन्नूभाई चाळ, पवई येथे राहणारा अठरा वर्षीय मोहमद फरहान हा पवई तलावात मासेमारीसाठी गेला असताना पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल (रविवारी) संध्याकाळी पवईत घडली. याबाबत पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून अधिक तपास करत आहेत.
‘फरहान हा आपल्या काही मित्रांसोबत मासेमारी करण्यासाठी काल रामबाग येथील पवई तलाव भागात उतरला होता. मासेमारी करताना त्याचा अचानक तोल जाऊन ५.१५ वाजता तो पाण्यात पडला’ असे याबाबत सांगताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या मुंबई अग्निशमन विभाग आणि पवई पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला. ६ वाजण्याच्या सुमारास फिशिंग क्लबच्या सुरक्षारक्षक इम्तियाज आणि टीमच्या मदतीने त्याला शोधून बाहेर काढण्यात यश आले.
राजावाडी रुग्णालयात नेले असता, त्याचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
फरहान याला फिट्स येत असत. त्याला फीट आल्यामुळेच तो पाण्यात पडला असावा असे पोलिसांना दिलेल्या जबाबत त्याच्या वडिलांनी म्हटले आहे.
पवई तलावात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे मासेमारी चालते, मात्र पालिका याला रोखण्यासाठी कोणतेही ठोस पाऊले उचलत नसल्याचा आरोपही काही स्वयंसेवी संस्थांकडून होत आहे.
No comments yet.