चांदिवली परिसरात पालिकेशी निगडीत असणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सोमवारी पालिका ‘एल’ विभागाचे सहाय्यक आयुक्त मनिष वळुंज यांना समस्यांचे पत्र देण्यात आले. त्यांनी यावेळी लवकरच त्यांच्या या समस्यांचा अभ्यास करत कारवाईचे आश्वासन दिले.
जवळपास ३.५ लाखाची लोकसंख्या असणाऱ्या चांदिवली परिसरात पाठीमागील काही वर्षात झपाट्याने वाढ झाली आहे. मात्र, शहर नियोजनात मात्र या भागाचे तीन-तेरा वाजले असून, येथील नागरिक रस्ते, गटारे, मोकळी मैदाने, फेरीवाले अतिक्रमण, वाहतूक कोंडी अशा एक ना अनेक समस्यांशी नियमित लढाई देताना पहावयास मिळत असतात. पवई आणि साकीनाका यांच्या मधोमध वसलेल्या चांदिवलीत होणाऱ्या समस्यांचा त्रास बाकी परिसरात असणाऱ्या लोकांना सुद्धा भोगावा लागतो.
या सर्व समस्यांना घेवून वारंवार लोकप्रतिनिधीना तक्रारी करून सुद्धा काहीच बदल घडत नसल्यामुळे २१ एप्रिलला चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिशनच्या नेतृत्वात या परिसरात नागरिकांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता.
केवळ मोर्चा काढून आणि निषेध नोंदवण्यावरच मर्यादित न-राहता, चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशनने पुढचे पाऊल उचलत सोमवारी महानगरपालिका ‘एल’ विभागाचे सहाय्यक आयुक्त मनिष वळुंज यांची भेट घेवून त्यांना आपल्या परिसरातील पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या समस्यांचे पत्र दिले.
‘आपण एकविसाव्या शतकात राहत असलो तरी चांदिवली येथील सुविधा मात्र एकोणिसाव्या शतकातील आहेत. परिसरात अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या बाहेरील जागेवर फुटपाथवर अतिक्रमण केल्याने चालण्यास जागा उरलेल्या नाहीत. बेकायदेशीर फेरीवाल्यांची परिसरात वाढती संख्या नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. वाहतूक कोंडी आणि खोदलेले रस्ते हे तर नेहमीचेच’ असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना संस्थेचे संस्थापक सदस्य मनदीप सिंग यांनी सांगितले.
अजून काही नागरिकांनी बोलताना सांगितले की, ‘कोणत्याही लोकप्रतिनिधीकडे जावा ते फक्त आश्वासन देत आहेत. पाठीमागील काही दिवसापासून तर निवडणूक आणि आचारसंहिता हेच एक कारण त्यांना पुरेसे झाले आहे. मात्र त्यांच्या या टोलवाटोलवीत आमच्या समस्या मात्र दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.’
चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशनने मांडलेल्या समस्या
- फुटपाथवर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. नागरिकांना चालण्यास जागा उरलेली नाही.
- इमारतीतून निघणारा कचरा हा पालिकेकडून नियमितरित्या उचलला जात नाही.
- रस्त्यांवर आणि फुटपाथवर खोदकाम करून सतत काम सुरु असते, त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. खोदलेले रस्ते व्यवस्थित रित्या बनवले जात नाहीत. वेगवेगळ्या पातळ्यांवर असणाऱ्या रोड्समुळे रस्त्यांवर पाणी जमा होते.
- नहार अम्रित शक्ती आणि चांदिवली फार्म रोडच्या गटारांवर झाकणे नाहीत.
- कमकुवत गटारांच्या झाकणामुळे निर्माण होणारा धोका.
- परिसरातील गटारे साफ केली जात नसून, तेथे मच्छरांची पैदास होत आहे.
- परिसरातील रस्ते साफ केले जात नाहीत. अनेक ठिकाणी कचरा तसाच पडून असतो ज्यामुळे अस्वच्छता पसरते.
- पालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या कामांची माहिती देणारे फलक लावण्यात येत नाहीत. कंत्राटदार मनमानी पद्दतीने कामे करतात.
चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशनने दिलेल्या तक्रारीनंतर परिसरात काही प्रमाणात बदल दिसू लागले असून, फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे पाऊल पालिकेने उचललेले पहावयास मिळत आहे.
No comments yet.