मुंबई मेट्रो ६ प्रकल्पाचे काम जोमाने सुरु असून, जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर रामबाग येथे येणाऱ्या स्थानकाला रामबाग (चांदिवली) असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी चांदिवलीकरांकडून जोर धरू लागली आहे. यासाठी सर्व प्रशाकीय यंत्रणांसोबतच राज्याच्या विविध मंत्र्यांना पत्रव्यवहार करण्यात आले आहेत.
पश्चिम उपनगरातील अंधेरीतील स्वामी समर्थ नगर-लोखंडवाला ते पूर्व उपनगरातील विक्रोळी आणि कांजूरमार्ग यांना १३ स्थानकांद्वारे जोडणारी मुंबई मेट्रो पिंक लाईन (लाईन-६) या १५.१८ किमीच्या बांधकामाधीन उन्नत मेट्रो मार्गाचे काम सध्या मोठ्या वेगाने सुरु आहे.
स्थानकांमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स, आदर्श नगर, मोमीन नगर, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, श्यामनगर, महाकाली लेणी, सिप्झ गाव, साकीविहार रोड, रामबाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजूरमार्ग (प) आणि विक्रोळी-पूर्व द्रुतगती महामार्ग यांचा समावेश आहे. . पिंक लाइन आदर्श नगर येथे यलो लाइन, सिप्झ येथे एक्वा लाइन, कांजूरमार्ग (पश्चिम) येथे ग्रीन लाईनसह, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथे लाल लाईन आणि पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी येथे मुंबई उपनगरीय रेल्वे आणि मध्य रेल्वेवरील कांजूरमार्ग येथे जोडली जाणार आहे.
या मेट्रो मार्गीकेमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होत कायपालट होणार असल्याचे म्हटले जात असतानाच पवई पाठोपाठ झपाट्याने विकास होत असलेल्या चांदिवलीचा विचार करता रामबाग येथे येणाऱ्या मेट्रो स्थानकाला रामबाग (चांदिवली) असे नाव देण्याची मागणी चांदिवलीकरांकडून होत आहे. या संदर्भात येथील स्थानिक नागरिक, विविध मंडळे आणि सामजिक कार्यकर्ते यांच्याकडून मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA), महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन, मेट्रो प्राधिकरण यांच्यासह राज्याच्या विविध मंत्र्यांना पत्रव्यवहार करत नाम विस्ताराची मागणी केली आहे.
या संदर्भात बोलताना चांदिवली नामविस्तार कृती समितीचे अजय शेलार यांनी सांगितले कि, “चांदिवली गाव हा या भागातील एक जुना आणि मोठा परिसर आहे. पाठीमागील काही वर्षात या परिसराचा झपाट्याने विकास झाला असून, येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात येथे बदल पहावयास मिळणार आहेत. अशात या परिसराचे मूळ असणारे चांदिवली हे नाव कायम राहणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही चांदिवलीकर म्हणून रामबाग येथील मेट्रो स्थानकाला रामबाग (चांदिवली) असे नाव देण्यात यावे अशी मागणी करत आहोत.”
ते पुढे म्हणाले कि, “मुंबईतील पहिल्या मेट्रो प्रकल्पातील जे बी नगर (चकाला) या नावाच्या धर्तीवर आमची ही मागणी असून, एमएमआरडीएसह मेट्रो प्राधिकरण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मंत्र्यांकडे चांदिवलीकरांच्या या मागणीसाठी पाठपुरावा करत आहोत.”
No comments yet.