हवाई सुंदरीची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन तरुणींना गंडा घालणाऱ्या नासिर हुसेन मोहमद्दीन खान या ठगाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापूर्वीही साकीनाका आणि नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खानने अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
पवईमध्ये राहणारी निता (बदललेले नाव) हवाई सुंदरीचे प्रशिक्षण घेऊन चांगल्या नोकरीच्या शोधात होती. नोकरीच्या शोधात असतानाच एका संकेतस्थळावर हवाई सुंदरीच्या नोकरीची जाहिरात पाहून तिने त्याबाबत चौकशी केली. नोकरीसाठी २ लाख भरावे लागतील म्हणून सांगण्यात आले. नीताने त्वरित व्यवस्था करून ६० हजार रुपये खानला त्याच्या भांडूप येथील कार्यालयात नेवून दिले. यावेळी तिच्या एका मैत्रिणीने सुद्धा या नोकरीसाठी पैसे भरले.
नीताला मिळालेले नियुक्ती पत्र घेऊन ती पत्त्यावर गेली असता अशी नियुक्ती करण्यात आले नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. याबाबत खानकडे विचारणा केली असता त्याने सुरुवातीला टोलवा टोलवीची उत्तरे दिली आणि काही दिवसानंतर आपला फोनच बंद करून टाकला.
फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच नीताने पवई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंद केली, ज्यानुसार शनिवारी खानला अटक करण्यात आली. त्याने यापूर्वी साकीनाका, नागपाडा आणि भांडूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याचे समोर आले असून, भांडुप पोलिसांनी त्याला गुन्ह्यात यापूर्वीच अटक केली होती.
No comments yet.