पवई हिरानंदानी येथे प्रमोद महाजन उद्यानाच्या बाजूला नागरिकांच्या सुविधेसाठी एक सुसज्ज असे सार्वजनिक शौचालय बनवण्यात आले आहे. मात्र बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालय पहिल्या दिवसापासूनच सुविधा उपलब्ध नसल्याच्या नावाखाली बंद ठेवत नागरिकांचा पैसा पाण्यात घालण्यात आलेला आहे. त्यामुळे जर सुविधा नव्हत्या तर हे शौचालय बांधलेच का? असा प्रश्न आता पवईकर करत आहेत.
उंच उंच गगनचुंबी इमारती, साफ सुथरे रस्ते, सुसज्ज – हिरवीगार उद्याने, मुलांना खेळायला मैदाने, लोकांना चालायला फुटपाथ अशा एक ना अनेक सुविधांनी नटलेल्या हिरानंदानी परिसरात कशाचीच कमी नसावी असे प्रत्येकाला वाटत असावे. मात्र असे नाहीये येथे गेली कित्येक वर्ष नागरिक सार्वजनिक शौचालयासाठी झटत आहेत. तसे पाहता येथील उद्यानांमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी शौचालये बनवण्यात आली आहेत. मात्र ती उद्यानाच्या वेळातच उघडी असल्याने इतर वेळी नागरिकांची चांगलीच दैना उडते.
सार्वजनिक शौचालयाची गरज काय?
जवळपास २ लाखाच्या घरात लोकसंख्या असलेल्या या एवढ्या मोठ्या परिसरातील अनेक घरात आसपासच्या परिसरातील महिला घरकामासाठी, तर पुरुष – ड्रायव्हर, सुरक्षारक्षक, माळी अशा कामासाठी येत असतात. येथे असणारी कार्यालये आणि रहिवाशांच्या सोयीसाठी रिक्षा, कार उभ्या असतात या सर्वांसाठी या परिसरात सार्वजनिक शौचालय असणे आवश्यक आहे.
गरज असतानाही हिरानंदानी परिसरात सार्वजनिक शौचालयाची उपलब्धता नसल्याने नवीन हिरानंदानी शाळेजवळील मोकळी जागा, एडन बंग्लो जवळील रस्त्यावरील भाग, जुन्या हिरानंदानी शाळेजवळील परिसर अशा ठिकाणी आडोशाचा फायदा घेवून नागरिकानी उघड्यावरच मुतारी बनवली आहे.
या सर्वांचा विचार करता आणि नागरिकांच्या मागणीस्तव हिरानंदानीतील प्रमोद महाजन उद्यानाच्या बाहेरील भागात एवेलोन इमारतीसमोर एक सार्वजनिक शौचालय आमदार, नगरसेवक यांच्या प्रयत्नातून आणि शाखाप्रमुख यांच्या पाठपुराव्यातून बांधण्यात आले. याबाबत बनेर लावून जाहिरात देखील करण्यात आली. मात्र हे शौचालय सुविधा नसल्याच्या कारणास्तव कधी जनतेसाठी खुले करण्यात आलेच नाही.
नाईलाजास्तव येथे उभ्या असलेल्या रिक्षा चालकांनी आणि पादचाऱ्यानी त्या अवस्थेतच त्याचा उपयोग करण्यास सुरुवात केली. काही दिवसातच शौचालय भरून परिसरात दुर्गंधी पसरू लागली. संपूर्ण परिसरात घाण पसरल्याने नंतर नागरिकांनी आत जाण्याऐवजी शौचालयाच्या बाहेरच मुतारी बनवली. यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना आणि मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या लोकांना येथून येणाऱ्या उग्र वासाचा त्रास जाणवू लागला आणि हे सार्वजनिक शौचालय अवघ्या काही दिवसातच बंद पडले.
शौचालय बंद पडून कित्येक महिने उलटून गेले असूनही अद्याप हे शौचालय दुर्लक्षित असून, त्यातच this toilet is out of order, hence it is closed ची नोटीस लावून त्यात भर घातली आहे. अखेर अडचण काय आहे? जर सुविधा नव्हती तर शौचालय बांधलेच का? अजून सुविधा झाली नाही का? झाली असेल तर शौचालय कधी उघडणार आणि नसेल तर सोय कधी होणार? असे प्रश्न आता स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत.
यासंदर्भात बोलता एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले कि, “या शौचालयाला पाण्याची सोय करण्यात आली नसल्याने हे शौचालय बंद ठेवण्यात आले आहे. लवकरच या शौचालायचे काम एका संस्थेला देण्यात येणार असून, हे नागरिकांच्या सुविधेसाठी खुले करण्यात येणार आहे.”
No comments yet.