नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मुंबई उपनगरातील वीजग्राहकांना ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’ कंपनीकडून आलेल्या वाढीव बिलांमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. या वाढीव बिलाविरोधात आज (बुधवार, १२ डिसेंबर) संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून अदानी कंपनीचा निषेध केला. आपला निषेध नोंदवण्यासाठी कंपनीच्या साकीनाका येथील वीज भरणा केंद्रावर नागरिकांचा मोर्चा धडकला.
यावेळी चांदिवली, साकीनाका, मरोळ तसेच आसपासच्या विभागातील वीजग्राहक मोठ्या संख्येने रस्त्यावर आले होते. अदानी कंपनीच्या निषेधाने संपूर्ण परिसर दणाणला होता. राष्ट्रीय एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अब्बास मिर्जा यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
साधारण येणाऱ्या बिलापेक्षा अचानक जास्तीचे विज बिल यायला लागल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. याबाबत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून ग्राहकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत, तपास करण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग द्विसदस्यीय समिती नेमण्याचे आदेश दिलेले आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने कंपनीकडे या तक्रारींबाबत काही मुलभूत प्रश्नांची विचारणा केली होती. मात्र, कंपनीने कोणतही उत्तर दिले नसल्याने आयोगाने तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
‘कंपनी विरोधात शासनाने चौकशीचे आदेश दिले असले तरी ज्या पद्धतीने ग्राहकांची लूट सुरू आहे ती कदापि सहन केली जाणार नाही. मुंबईकरांचा कष्टाचा पैसा चुकीच्या पद्धतीने कोणी लुटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याविरोधात जनता आंदोलन करणारच’ असे याबाबत बोलताना मोर्चेकऱ्यांनी सांगितले.
प्रत्येकाला स्वतंत्र वीज मीटर, प्रत्येक महिन्याला अचूक रीडिंग करून बिले पाठवण्याची मागणी करतानाच कंपनीने आपले सर्व व्यवहार पारदर्शक करून एकूण खर्च आणि एकूण नफा ताळेबंदसह संकेतस्थळावर अपलोड करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांनी या मागण्यांची दखल घेत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
No comments yet.