५०० रुपयाच्या बनावट नोटा (fake currency) व्यवहारात आणण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका ३१ वर्षीय व्यक्तीवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) कारवाई करत अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट १०ने (unit 10) या व्यक्तीला पवई (Powai) येथून मंगळवारी अटक केली असून, त्याच्या ताब्यातून ८० लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. सौजन्य भूषण पाटील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पालघर जिल्ह्यातील उमरोली परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पवई येथील पवई उद्यान परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सतीश कांबळे यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने मंगळवार, २७ डिसेंबरला गुन्हे शाखेच्या पथकाने उद्यान परिसरात सापळा रचून पाळत ठेवली होती. यावेळी एक व्यक्ती दुचाकीवरून (MH-48-AZ-1576 ) येऊन लाल रंगाच्या बॅगसह परिसरात संशयीतरित्या वावरत असल्याचे पथकाला दिसून आले.
“संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळ असलेली बॅग चेक केली असता बॅगेत ५०० रूपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा असल्याचे आढळून आले,” असे यासंदर्भात बोलताना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांना बॅगेतून ५०० रूपयांच्या नोटांचे १०० नोटा असलेले १६० बंडल, म्हणजेच १६००० नोटा मिळून आल्या आहेत. पोलीस चौकशीत सदर व्यक्तीने आपले नाव सौजन्य भूषण पाटील असून, आपल्या दुसऱ्या साथीदाराच्या मदतीने या नोटा तो व्यवहारात आणण्यासाठी घेवून आला असल्याचे सांगितले.
पाटील याच्या विरोधात बनावट नोटा बाळगणे, त्या चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात भादवि कलम ४८९ (अ), ४८९ (ब), ४८९ (क), ४८९ (ड), १२० (ब), ३४ सह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला बुधवारी न्यायालयापुढे हजर केले असता त्याला ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिस कसून तपास करत असून, त्याने या पूर्वी बनावट नोटा कोठे-कोठे व्यवहारात आणल्या आहेत. तसेच त्याच्यासोबत यात आणखी कोण-कोण सहभागी आहे, याची माहिती मिळवत आहेत.
१० टक्के कमिशन देऊन बनावट नोटा बाजारात चलनात आणल्या जात असून, बनावट नोटा छापणाऱ्या सिंडिकेटमध्ये चार ते पाच जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यापैकी एक सूत्रधार नाशिकचा असल्याचा पोलिसांना संशय असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
No comments yet.