पवई तलावात विसर्जनासाठी जाणाऱ्या नागरिकांना पालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे पाण्यात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. मंगळवारी पवई तलाव भागात मगरीचा वावर आढळून आला. पवई तलावामध्ये असलेल्या मगरींचा वावर पाहतात पवई तलावात थेट गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पाण्यामध्ये उतरण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. गणेश विसर्जनासाठी पवई तलाव परिसरामध्ये पालिका प्रशासनाकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे.
आज ५ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन मुंबईच्या विविध भागात केले जात आहे. पवई तलावात सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक गणपती विसर्जनासाठी येत असतात. पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर ज्या ठिकाणी विसर्जन करण्यात येते त्या भागात जाळीचे कुंपण तयार करण्यात आले आहे. या कुंपणाच्या आसपास मगरीचा वावर दिसून आला असून, त्यामुळे पवई तलाव परिसरात गणेश विसर्जनासाठी जर तुम्ही येत असाल तर पाण्यात उतरण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका असा इशारा पालिका आणि पोलीस प्रसानाकडून देण्यात आला आहे. या ठिकाणी जीवरक्षक सोबतच गणेश विसर्जनासाठी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. या स्वयंसेवकांच्या सहाय्यानेच विसर्जन करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
याबाबत पुष्टी करतानाच पवई पोलिसांनी सांगितले कि, “पोलीस आणि पालिका प्रशासनातर्फे गणपती विसर्जनाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. पवई तलावात मगरी आहेत आणि याबाबत सूचनाही पालिकेतर्फे तलाव परिसरात ठिकठिकाणी लावण्यात आल्या आहेत. गणेश विसर्जनाच्या काळात प्रत्येकवर्षी मगरीचा वावर विसर्जनासाठी बनवलेल्या कुंपणाच्या आसपास दिसून येतो. यावर्षीही तिचा वावर दिसून आलेला असल्याने नागरिकांना तलावात जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.”
No comments yet.