डीजीटायजेशानमुळे वाढत्या सायबर गुन्हेगारीला रोखणे आणि अशा प्रकारे गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पवई आणि साकिनाका पोलीस ठाण्याच्या प्रत्येकी ३ अशा सहा अधिकाऱ्यांना सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. मुंबई पोलिसांच्या बांद्रा – कुर्ला (बीकेसी) येथील सायबर सेल विभागात सायबर तज्ञांकडून अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण दिले जात आहे.
युनिट १० मधील पवई, साकीनाका सह अंधेरी, एमआयडीसी, मेघवाडी आणि जोगेश्वरी या पोलीस ठाण्यातील प्रत्येकी ३ अधिकाऱ्यांना हे विशेष प्रशिक्षण प्राथमिक स्थरावर दिले जात आहे.
प्रशिक्षित अधिकाऱ्यामुळे फिशिंग, ऑनलाईन फसवणूक, सोशल माध्यमातून होणारी गुन्हेगारी, इमेल आणि सोशल माध्यमातून करण्यात येणारे अश्लील वर्तन/ संदेश, हकिंग, कॉपीराईट चोरी सारख्या ऑनलाईन गुन्ह्यांना पोलिस ठाणे पातळीवरच रोखणे आणि तपास करणे शक्य होणार आहे.
“वाढत्या सायबर गुन्हेगारीला पाहता आम्ही सायबर गुन्हेगारी रोखण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना नियमित पोलीस ठाण्याचे कामकाज, तपास यापासून अलिप्त ठेवून त्यांना फक्त सायबर गुन्हे नोंद करणे आणि त्यांचा तपास करण्याचे कामच दिले जाणार आहे.” असे यावेळी बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
काम करणाऱ्या महिलांसोबत सोशल माध्यमातून त्यांचे मित्र किंवा सहकाऱ्यांकडून अशा प्रकारे सायबर गुन्हे घडल्याच्या तक्रारी येत असतात. ज्यामध्ये कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण हे अधिक आहे.
पोलीस ठाण्यात असणारा प्रत्येक अधिकारी हा टेक-सेवी असणे शक्य नाही आहे त्यामुळे नोंद झालेल्या सायबर गुन्ह्यातील व्यक्तीचा आयपी अड्रेस काढण्यापासून तपास जसजसा पुढे जाईल प्रत्येक वेळी त्याला कॉम्पुटर एक्स्पर्टची गरज लागते किंवा असे गुन्हे उघडकीस येण्यास वेळ जातो. योग्य मदत ना मिळाल्यास पुढे असे गुन्हे सायबर सेलला वर्ग केले जातात जे पाहता प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रशिक्षित अधिकारी असल्यास या गुन्हांचा तपास करणे आणि असे गुन्हे रोखणे सहज शक्य होणार आहे.
“अधिकाऱ्यांची निवड करताना तरुण आणि तंत्रज्ञानाची ओळख असणारे चेहरे निवडून सायबर तज्ञ आणि गुन्हे प्रकटीकरण अधिकारी अशा दोन्ही स्थरातील तज्ञांकडून प्रशिक्षण दिले जात असल्याने गुन्हे रोखणे आणि त्याच्या तपासा सोबतच पोलीस ठाण्यातील इतर गुन्ह्याची उकल करण्यात त्यांची मदत होणार आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचे कामकाज अजूनही गतिमान होईल,” असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
No comments yet.