हिरानंदानीत बांधकाम थांबलेली जागा बनली आजार पसरवणाऱ्या मच्छरांचा उत्पत्तीचा अड्डा

हिरानंदानी गृप दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. स्थानिक नगरसेवक वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या तक्रारीनंतर पालिका एस विभाग अधिकाऱ्यांनी आज भेट देवून केली परिस्थितीची पहाणी.

हिरानंदानी विकासकाकडून पवई, हिरानंदानी येथील ओडिसी आणि तिवोली इमारतींजवळ सुरु असणाऱ्या एका नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून थांबवण्यात आले असून, येथे जमा झालेल्या घाण पाण्यामुळे आजार पसरवणारे जीवाणू आणि मच्छरांची उत्पत्ती होऊन परिसरात आजार पसरू लागले आहेत. याबाबत स्थानिक प्रतिनिधींनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला तक्रार केल्यानंतर आजच पालिका अधिकाऱ्यांनी परिसराला भेट देवून पाहणी केली.

मुंबई उच्च न्यायालयाने हिरानंदानी गृप ऑफ कंपनीजला पवईमध्ये कमी दराची घरे बांधून देण्याचा आदेश दिल्यानंतर हिरानंदानी परिसरात अशा प्रकारची घरे बनवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. निवडण्यात आलेल्या तीन जागांपैकी ओडिसी आणि तिवोली इमारतींजवळ असणाऱ्या एका मोकळ्या जागेत कमी दराची घरे असणाऱ्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. इमारतीचे बांधकाम सुरु असतानाच याला विरोध झाल्याने येथील बांधकाम थांबवण्यात आले आहे.

पालिका अधिकारी पाहणी करताना

“बांधकाम थांबवण्यात आल्यामुळे येथील भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिले असून, त्यात आजार पसरवणाऱ्या मच्छरांची उत्पत्ती होऊन आसपासच्या परिसरात राहणारे रहिवाशी आजारी पडू लागले आहेत. जमा पाण्यावर हिरवा रंग पसरला आहे. परिसरात दुर्गंधी सुद्धा पसरली असून, आम्हाला मोकळा श्वास घेण्यासाठी घराच्या खिडक्या उघड्या ठेवणे अशक्य झाले आहे” असे याबाबत बोलताना आसपासच्या परिसरात राहणाऱ्या काही रहिवाशांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

हिरानंदानी समूहाशी याबाबत संपर्क साधला असता प्रशासकीय महाव्यवस्थापक सुदिप्ता लेहिरी यांनी सांगितले, “बांधकाम थांबले असले तरी जमिनीतून निचरा होऊन वरती येणारे पाणी आमच्याकडून नियमित पंपांच्या साहय्याने उपसले जात आहे. नियमितपणे आमच्याकडून आणि पालिकेच्या मदतीने औषध फवारणी सुद्धा येथे केली जात आहे. पाणी जमा होऊ नये आणि आजार पसरू नये अशी सर्वोतोपरी उपाययोजना आमच्याकडून राबवल्या जात आहेत, त्यामुळे येथे आजार उत्पन्न करणाऱ्या मच्छरांची पैदास होण्याचा प्रश्नच येत नाही.”

मोठ्या प्रमाणात स्थानिकांकडून याबाबत स्थानिक नगरसेवकांना तक्रारी मिळत असल्यामुळे त्यांनी पालिका एस विभाग सहाय्यक आयुक्त यांना याबाबत पत्रव्यवहार करून योग्य त्या कारवाईची मागणी केली होती. “पालिका इमारत व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी येवून आज परिस्थितीची पाहणी केली आहे आणि लवकरच ते आपला अहवाल सादर करतील”, असे यावेळी बोलताना नगरसेवक वैशाली पाटील आणि श्रीनिवास त्रिपाठी यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!