मेट्रो ६ प्रकल्प: पवईतील दोन पादचारी पूल हटवण्यास सुरुवात

प्रमोद चव्हाण, गौरव शर्मा

मेट्रो ६ प्रकल्प: पवईतील दोन पादचारी पूल हटवण्यास सुरुवात

स्वामी समर्थनगर ते विक्रोळी (पूर्व धृतगती मार्ग) या मार्गावर सुरु असणाऱ्या मेट्रो ६च्या मार्गात येणाऱ्या पवईतील २ पादचारी पुलांना हटवण्याची तयारी सुरु झाली आहे. यामध्ये आयआयटी मार्केट गेट समोरील पादचारी पूल आणि मिलिंदनगर येथील पादचारी पुलाचा समावेश आहे.

जेवीएलआर मार्गाच्या निर्मितीवेळी भविष्यात येथून जाणाऱ्या वाहनांच्या संख्या आणि रस्ता क्रॉसिंगला येणाऱ्या अडचणी पाहता पवईतील लोकवस्ती आणि कार्यालये असणाऱ्या भागांमध्ये नागरिकांना रस्ता क्रॉस करण्यास सुविधा व्हावी म्हणून करोडो रुपये खर्च करून पादचारी पुलांची निर्मिती करण्यात आली होती. हे पादचारी पूल हटवले गेले तर येणाऱ्या काळात येथील लोकांना रस्ता क्रॉस करण्यास मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता पाहता येथील नागरिकांनी याला विरोध दर्शवला आहे.

जेविएलआरवरून जाणाऱ्या स्वामी समर्थनगर ते विक्रोळी (पूर्व धृतगती मार्ग) या मार्गावर मेट्रो ६ या १४.५ किलोमीटर लांबीच्या कॉरीडोरच्या निर्मितीचे काम डिसेंबर २०१८ पासून सुरु झाले आहे. मात्र, याच्या निर्मितीच्या आधीपासूनच काही रहिवाशी आणि सामाजिक संस्था तसेच पर्यावरण प्रेमी यांनी भविष्यातील संभाव्य समस्यांना पाहता हा मेट्रोचा मार्ग भूमिगत करण्याची मागणी केली होती. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या जेविएलआर मार्गावर आधीपासूनच वाहनांची मोठी गर्दी असते. त्यामुळे वाहतूक कोंडीसह या मार्गाच्या निर्मितीत खर्च करण्यात आलेल्या करोडो रूपयांचा चुराडा करून आणखी समस्या वाढवू नयेत अशी त्यांची मागणी आहे.

मेट्रो ६ प्रकल्प: पवईतील दोन पादचारी पूल हटवण्यास सुरुवात

“पर्यावरण रक्षणासाठी उपाययोजना, स्टेशनची ठिकाणे, या मार्गावर असणारी वाहतूक कोंडी, नागरिकांच्या मागण्या अशा कशाचाच विचार न करता हा प्रकल्प सुरु झाला असून, कोणताही नवीन प्रकल्प राबवण्यापूर्वी नागरिकांची मते जाणून घेणे आवश्यक असते असा आक्षेप त्यांनी नोंदवला होता. “नागरिकांचा विरोध आणि आक्रोश पाहता जवळपास ६ महिन्यानंतर एमएमआरडीएने याबाबत सल्ला मागितला होता. नागरिकांनी यावेळी आपले आक्षेप नोंदवतानाच भूमिगत मेट्रोसह, जेविएलआर मार्गाला नुकसान न होता इतर मार्गांच्या आधारे हा प्रकल्प कसा बनवता येईल याबाबत पर्यायी मार्ग सुद्धा सुचवले होते. मात्र त्यानंतरही नागरिकांच्या सूचनांना विचारात न घेता काम तसेच सुरु ठेवण्यात आले आणि आता या मार्गावरील २ पादचारी पुलांना हटवण्यात येत आहे,” असे याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

आयआयटी मार्केट गेट जवळील पादचारी पूल हटवण्यास सुरुवात

पवईतील आयआयटी मार्केट गेट जवळ निर्माण करण्यात आलेला पादचारी पूल हटवण्यास सुरुवात झाली आहे. पाठमागील २ आठवड्यापासून या कामाची सुरुवात झाली आहे. तशी सूचना या पुलावर लावत नागरिकांना या पुलावरून येण्याजाण्यास मनाई करण्यात आली आहे. “एमएमआरडीए आणि आयआयटी प्रशासन यांच्यासह आवश्यक त्या सर्व अनुमती मिळवत हा पादचारी पूल हटवण्यास आम्ही सुरुवात केली आहे. काम सुरु करण्यापूर्वी आम्ही या पादचारी पुलांवरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या, त्याचा होणारा उपयोग याबाबत सर्वे करून मगच निर्णय घेतला आहे. मेट्रोचे काम पूर्ण होताच आयआयटी मेनगेटपासून २०० मीटर अंतरावर नागरिकांच्या सुविधेसाठी याला पुन्हा बनवण्यात येईल. मेट्रो सुरु झाल्यावर असणारी त्यावेळची परिस्थिती पाहता त्याची उंची आणि आवश्यक गोष्टींचा विचार करून हा पादचारी पूल पुन्हा बनवण्यात येणार आहे,” असे याबाबत बोलताना अरविंद कुमार, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन प्रोजेक्ट मॅनेजर – १ यांनी सांगितले.

मिलिंदनगर येथील पादचारी पूल हटवून बनवणार स्टेशन

मेट्रो ६ मार्गात असणारा मिलिंदनगर येथील पादचारी पूल देखील हटवण्यात येणार असून, तिथे मेट्रो स्टेशन येणार आहे. “आम्ही एमएमआरडीएकडे पत्रव्यवहार केला आहे. त्याची अनुमती येताच काम सुरु करण्यात येईल. तिथे मेट्रो स्थानक येत असल्याने नागरिक तिथूनच क्रॉसिंग करू शकतात त्यामुळे याला पुन्हा दुसरीकडे बनवण्यात येणार नाही,” असे याबाबत बोलताना संजय कुमार, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन प्रोजेक्ट मॅनेजर – २ यांनी सांगितले.

“आता सध्या अजून इतर कोणत्याही पादचारी पुलाला हटवण्याचे नियोजन नाही. मात्र मार्गात अडथळा निर्माण करणारे इतर पादचारी पूल आवश्यकता भासल्यास भविष्यात हटवण्यात किंवा दुसरीकडे हलवण्यात येवू शकतात,” असे याबाबत बोलताना एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

पादचारी पूल हटवण्याच्या या निर्णयाला पवईकरांनी मात्र विरोध दर्शवला आहे. या पादचारी पुलांवरून आसपासच्या परिसरात राहणारे अनेक नागरिक ये-जा करत असतात. अशात हा पूल हटवण्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत वाहनांच्यामधून जीव मुठीत घेवून रस्ता क्रॉस करण्याची नामुष्की ओढवणार आहे. या संपूर्ण प्रकल्पात नागरिकांच्या मतांचा विचार कधीच केला गेलेला नाही. यावेळी सुद्धा हेच घडले आहे आणि पवईकर याचा पूर्ण विरोध करतील, असे मत यावेळी बोलताना काही पवईकरांनी व्यक्त केले.

पवईकरांची यावरील मते आपण आमच्या ‘पादचारी पूल हटवण्यास पवईकरांचा विरोध’ या पाठपुरावा बातमीत वाचू शकता. आपणही आपले मत आम्हाला या बातमीच्या खाली कमेंट करून किंवा [email protected] येथे पाठवू शकता.

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!