आयआयटी, चैतन्यनगर येथील दुर्गादेवी शर्मा उद्यान पुनर्जीवित करण्यासाठी आमदार निधीतून ४० लाख रुपयाचा फंड मंजूर झाला आहे. रविवारी ३ जुलै रोजी कामाचे उदघाटन आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते केले जाणार असून, लवकरच आयआयटीकरांना आपले हक्काचे उद्यान मिळणार आहे.
शहरात अनेक मैदानांवर एकतर अतिक्रमण झाले आहे किंवा त्यांची दुरावस्था झाली आहे. पवईच्या आयआयटी भागात दुर्गादेवी शर्मा उद्यान आणि हरिश्चंद्र शर्मा मैदान तर आहे, मात्र पालिका आणि स्थानिक नगरसेवक यांच्या दुर्लक्षामुळे त्यांची दुरावस्था झाली असून, ते चरसी व नशेखोर यांचा अड्डा बनले आहेत. लहान मुलांना खेळायची हक्काची जागा नसल्याने त्यांना रस्त्यांवरच आपले डाव मांडावे लागत असून, वाहनांच्या वर्दळीत जीवास धोका निर्माण झाला आहे.
स्थानिकांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, स्थानिक प्रतिनिधीचे लक्ष वेधले गेले, कार्टून बॅनरच्या माध्यमातून प्रश्न मांडले, एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र देवून याकडे लक्ष वेधले गेले, परंतू ढिम्म प्रशासनाला काही जाग आली नाही. मात्र, वार्ड क्रमांक ११५ शाखाप्रमुख निलेश साळुंखे आणि आमदार सुनील राऊत यांनी या समस्येला जाणत, दुर्गादेवी शर्मा उद्यानासाठी आमदार फंडातून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
याबाबत साळुंखे यांनी बोलताना सांगितले, “मुलांना या भागात एकही खेळाचे मैदान नाही, उद्यानांच्या दुरावस्थेमुळे जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी हक्काची जागा नाही आहे. ज्यासाठी आम्ही प्रयत्न करत आमदार सुनील राऊत यांचा आमदार निधी यासाठी मंजूर करून घेतला आहे. रविवारी ३ जुलै रोजी याचे उदघाटन करून कामास सुरुवात केली जाईल. लवकरात लवकर ते जनतेसाठी खुले केले जाणार आहे.”
उद्यानाला नवसंजीवनी देताना यात लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी, जेष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, जॉगींग ट्रॅक, आकर्षक लॉन, लाईट व्यवस्था व शौचालय अशा सुविधा या उद्यानात असणार आहेत.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.