सीमाशुल्क विभागाच्या एका इन्स्पेक्टर आणि त्यांच्या पत्नीला एका तोतयाने तिचा भाऊ असल्याचे सांगत १.९ लाखाला गंडवले आहे. तत्काळ पैशांची गरज असलेल्या आपल्या मित्राच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत या तोतयाने त्यांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात पवई पोलीस गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत.
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पवई पोलिसांनी सांगितले की, सीमाशुल्क अधिकाऱ्याच्या पत्नीने काही हिस्सा हस्तांतरित केला आणि उर्वरित पैसे त्यांचे पती (सीमाशुल्क अधिकारी) यांनी पाठवले आहेत. फसवणूक करणारा व्यक्ती आपला भाऊ नसल्याचा संशय न आल्याने तिने हा व्यवहार केला. मात्र फसवणूक करणार्याने तिच्या खात्यात पैशाचे हस्तांतरण केल्याचा दावा करून आणखी पैशांची मागणी केली तेव्हा अधिकाऱ्याला संशय आल्याने प्रकरण उघडकीस आले.
“पवईत राहणाऱ्या सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीला ८ जून रोजी एका व्यक्तीने फोन करून तो तिचा भाऊ बोलत असल्याबाबत सांगितले. रुग्णालयात असलेल्या मित्राच्या मुलाच्या मदतीसाठी पैशांची गरज असून, सर्व्हरच्या समस्येमुळे त्याला पैसे पाठवता येत नाहीत. त्यामुळे त्याने पैसे तिच्या खात्यावर पाठवले असून, तसा स्क्रीनशॉट सुद्धा तिला पाठवला. तिच्याशी सतत फोनवर बोलत तिचा विश्वास संपादन केला. त्याने एनईएफटीमार्फत पैसे ट्रान्सफर केले असून, लवकरच ते प्राप्त होतील. दरम्यान, त्याने तिला तिच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले,” असे पोलिसांनी याबाबत बोलताना सांगितले.
अधिकाऱ्याच्या पत्नीच्या खात्यात केवळ ९० हजार रुपये असल्याने तिने आपल्या पतीला फोन करून उर्वरित रक्कम भरण्यास सांगितले. “अधिकाऱ्याच्या पत्नीने घरी परतत असणाऱ्या आपल्या पतीला ती आपल्या भावाशी बोलत असून, त्याला आपल्या एका मित्राच्या रुग्णालयात असणाऱ्या मुलाच्या मदतीसाठी २ लाख रुपये पाठवायचे असून, सर्व्हरच्या समस्येमुळे त्याला शक्य होत नसल्याने ती रक्कम तिच्या खात्यावर पाठवली आहे. ती रक्कम त्याने दिलेल्या खात्यावर हस्तांतरित करावयाची असून, उरलेली रक्कम तुम्ही हस्तांतरित करा असे आपल्या पतीला सांगितले. अधिकाऱ्याने ७५ हजार आणि २५ हजार अशा दोन व्यवहारात ती रक्कम दिलेल्या खात्यावर पाठवून दिली.
“नंतर, जेव्हा अधिकारी घरी पोहचले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांची पत्नी अद्याप त्या व्यक्तीशी बोलत असून, ज्याने तिला अधिक रक्कम हस्तांतरित करण्यास सांगितले आहे. काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने अधिकारी त्याच्याशी बोलत असताना लक्षात आले की तो त्यांचा मेहुणा नाही. अधिकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नांना त्याने अस्पष्ट उत्तरे देत लाइन कट केली. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी पवई पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार नोंद केली आहे,” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
पवई पोलिसांनी याबाबत फसवणूकीचा गुन्हा नोंद करत, व्यवहारात वापरल्या गेलेल्या खात्याचा बँकेकडून व्यवहाराचा तपशील मागविला आहे.
No comments yet.