पर्यावरण सचिव व पालिका अतिरिक्त आयुक्तांना नदी संवर्धन संचालनालयाने दिला आदेश
पवई तलावाच्या प्रदूषणाची केंद्रिय पर्यावरण मंत्रालयाने गंभीर दखल घेत, राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाने याबाबतचा अहवाल मागवला आहे. राज्य पर्यावरण खात्याचे सचिव व मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांना पवई तलावात किती प्रदूषण झाले आहे? त्यावर काय कारवाई करण्यात आली? याचा सविस्तर अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पाठीमागील आठवड्यात याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना पवई तलावातील प्रदूषणाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
‘पॉझ’ या पर्यावरणवादी संस्थेने पवई तलावात होत असलेल्या प्रदूषणाबाबत नदी संवर्धन संचालनालयाला तक्रार केली होती. तलावातील प्रदूषणाबाबत पाठवलेली माहिती चिंताजनक असून, हे प्रदूषण का होत आहे? त्यावर कोणती कारवाई करण्यात आली? याचा अहवाल पाठवण्याचे आदेश संचालनालयाने दिले आहेत.
महापालिकेकडून मलनिसारण वाहिन्यांमार्फत सांडपाणी पवई तलावात सोडण्यात येत असल्याने तलाव प्रदुषित होत चालला आहे. तलावातील जीवसृष्टी नष्ट होत आहे. तलावातील मगरींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तलावाच्या या दुर्दशेबाबत आवर्तन पवईने वेळोवेळी पाठपुरावा करत प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले आहे.
पवई तलाव प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ‘पॉझ’ संस्थेतर्फे करण्यात आली आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.