हिरानंदानी–विक्रोळी रोडच्या निर्मितीसाठी आमदार आर. एन. सिंह (विपस) यांना महाराष्ट्र शासन नियोजन विभाग निधीतून १० लाखाचा फंड मंजूर
गेली अनेक वर्ष श्रेयवाद, कोर्ट-कचेरी अशा अनेक फेऱ्यात अडकल्याने दुर्दशा झालेल्या हिरानंदानी–विक्रोळी लिंक रोडला अखेर नवसंजीवनी मिळणार आहे. आमदार आर. एन. सिंह (विपस) यांनी प्रस्तावित केल्यानुसार जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांच्या कार्यालयातून आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत या रोडला बनवण्यासाठी १० लाख रुपयांचा फंड मंजूर करण्यात आला आहे. या रोडच्या निर्मितीच्या शुभारंभाचा कार्यक्रम या रविवारी सकाळी याच ठिकाणी पार पडणार आहे.
पवई, चांदिवली या भागात घाटकोपर, विक्रोळी दिशेने कामासाठी येणाऱ्या लोकांसाठी आणि पवईतून तिकडे जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी कैलाश कॉम्प्लेक्स मार्गे हिरानंदानीत येणारा एकमेव मार्ग उपलब्ध आहे. मात्र, या रस्त्यावरील पार्कसाईट सर्कल (टाटा पॉवर सर्कल) ते अक्षरधाम सर्कल हा संपूर्ण रस्ता मालकी वादामुळे कोर्टकचेरीच्या फेऱ्यात आणि श्रेयवादात अडकल्याने वाईट अवस्थेत आहे. या भागातून प्रवास करणाऱ्या लोकांचे शारीरिक हाल होत असून, ओबडधोबड आणि खड्डेमय रस्त्यातून जाताना अनेक वाहनांचे नुकसान सुद्धा होत आहे. याबाबत स्थानिक आणि प्रवासी अशा अनेक लोकांनी जबाबदार प्रशासनाला तक्रारी करून देखील काहीच फरक पडत नव्हता. काही नेत्यांनी या भागात खड्डे बुजवणे, डागडुजी सारखी कामे सुद्धा केली, मात्र ते जास्त कामी आले नाही. रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. अनेक लोक नाईलाजास्तव आणि जीव मुठीत घेऊन या रस्त्याने प्रवास करत असतात.
याबाबत नवनिर्वाचित भाजप आमदार आर. एन. सिंह (विपस) यांना सुद्धा तक्रारी मिळाल्या होत्या. ज्याची दखल घेत त्यांनी याचा पाठपुरावा करत दहा लाखाचा फंड मंजूर करून घेतला आहे.
“तक्रारींचा आम्ही सतत पाठपुरावा करत होतो. ज्याचे फळ म्हणून नुकतेच मला जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजुरीचे पत्र मिळाले आहे. या संपूर्ण कामासाठी १० लाखाचा फंड मंजूर झाला असून, येत्या रविवारी या कामाची सुरुवात करण्यात येणार आहे” असे आवर्तन पवईशी बोलताना आर. एन. सिंह यांनी सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.