ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी, घरकामास ठेवलेल्या महिलेनेच घरातील २ लाखाच्या सोन्या – हिऱ्याच्या दागिन्यावर हात साफ केल्याची धक्कादायक घटना हिरानंदानीमध्ये घडली आहे. या संदर्भात पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कसून तपास करत घरकाम करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. हेमादेवी संदीप कुमार यादव (३२ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिच्या ताब्यातून चोरीला गेलेले सोने, हिऱ्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
फिर्यादी शुभदा बासुरे या पवईतील हिरानंदानी परिसरात राहण्यास आहेत. त्यांचे आई – वडील हे देखील हिरानंदानीतील ग्लेन हाईट इमारतीत राहावयास असून, ज्येष्ठ नागरिक आहेत. हे दोघेही ज्येष्ठ नागरिक एकटेच घरी राहावयास असल्याने त्यांच्या देखभालीसाठी तसेच जेवण बनवण्यासाठी दीड महिन्यापूर्वी हेमादेवी नामक महिलेला नियुक्त करण्यात आले होते. ज्येष्ठ आई-वडिलांवर लक्ष ठेवण्यासाठी मुलीने घरात सीसीटीव्ही देखील बसवले होते.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ज्येष्ठ नागरिक महिलेच्या पाकिटातील काही पैसे गायब असल्याचे लक्षात आल्याने तिने आपल्या मुलीला याबाबत सांगितले होते. मुलीने घरी येवून आईचे पाकीट तपासले असता आईच्या वापरातील जुन्या सोन्याची अंगठी, डायमंड पेंडल, सोन्या-हिऱ्याचे दागिने चोरी झाल्याचे समोर आले, असे पवई पोलिसांनी सांगितले.
याबाबत मुलीने पवई पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
“शंका आल्याने मुलीने घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता घरकाम करणाऱ्या महिलेचे वागणे तिला संशयास्पद वाटले. त्या अनुषंगाने आम्ही घरकाम करणाऱ्या महिलेची माहिती मिळवण्यास सुरुवात केली.” असे तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
“घरातील सीसीटीव्ही फुटेज आणि नोकरी स्विकारताना घरकाम करणाऱ्या महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारावर आम्ही तिचा शोध घेत वर्षानगर, विक्रोळी, पार्कसाईट येथील तिला तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने सदर गुह्याची कबुली दिली,” असे आवर्तन पवईशी बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले “महिलेकडून आम्ही चोरीस गेलेली १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन डायमंड पेंडल सहित, ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी डायमंड सहित असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.”
“लग्न झाल्यानंतर २ महिन्यापूर्वीच महिला मुंबईत आली आहे. घरकाम करताना झटपट मोठे होण्याच्या लोभाने तिने ही चोरी केली आहे,” असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत यांनी सांगितले.
वपोनि बुधन सावंत, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि विनोद लाड, पोलिस हवालदार दामू मोहोळ, पोलिस हवालदार प्रवीण सावंत, पोलिस हवालदार वैभव पाचपांडे, महिला पोलीस शिपाई शितल लाड, पोलीस शिपाई भरत देशमुख, पोलीस शिपाई भास्कर भोये, पोलीस शिपाई प्रशांत धुरी यांनी गुन्हा उघडकीस आणला.
No comments yet.