मी कुणासाठीही थांबत नाही

@ परिस ( प्रसाद वाघ )

समुद्राच्या किनाऱ्यावरुन तो धावत सुटला होता. मी त्याला मागून कितीतरी हाका मारल्या. वाळूत रुतलेल्या त्याच्या पावलांवर पाऊल ठेवत मी रेंगाळत होतो. पठ्ठ्या काही थांबायचे नाव घेईना. शेवटी मी  त्याच्या पावलांवर पाऊल टेकवायचा खुळा नाद सोडून दिला. थोडीशी गती वाढवली आणि त्याच्या शेजारी येवून पळायला लागलो.

हाय !

_ हाय !!

अरे किती जोरात पळतोस तू, केंव्हाचा हाका मारतोय. जरा थांब तरी.

_ अरे मला थांबता नाही येत मधेच, रोजचा नियम आहे. तू बोलत राहा मी ऐकतोय.

कपाळ माझं, अस पळता पळता मला बोलता नाही येत.

_ त्यावर नुसताच हसला पण थांबला नाहीच.

तुला दमायला होत नाही का रे ?

_ नाही अजीबात नाही

पण काय होईल जरासा थांबलास तर ?

_ अंधार होण्याआधी काही दिवे लागायचे आहेत त्यांना उशीर होईल.

हो पण जरासा थांबलास तर जे दिवे विझणार आहेत त्यांना दोन क्षण जास्तीचे मिळतील ना ?

_ हा विचार तू करु शकतोस मी नाही. अंधाराला तरी दोन क्षण जास्तीचे का देवू मी ?

समजा बिघडले काही हिशोब तर तुझे काय जाणार आहे ?

_ हे बघ हिशोब ठेवणे माझे काम नाही. जे काम माझे आहे ते मी करतोय, तू ही करावेस तुझे काम.

तुला अस वाटत नाही तू जरा जास्तच तुसडा आहेस ?

_ अरे मला मन नावाचा व्यत्यय नाहीये. ते तुझ्यासाठी आहे. तू माझ्याजागी आलास तर तुलाही तेच करावे लागेल.

छ्या: तुझ्या असल्या कामात मला जराही रस नाही

_ हे सांगायला धावतोयस का ?

नाही तू कधी थांबतोस ते विचारायला आलो होतो ?

_ ते माझ्या हातात नाही

बर कुठवर पळणार आहेस ते तरी सांग ?

_ ते ही माझ्या हातात नाही

कशासाठी पळतोय निदान ते तरी सांग ?

_ कर्तव्य म्हणून, कदाचित तुमच्या भल्यासाठी असेल.

चक्क विचार करतोयस की आणि म्हणे मन नावाचा व्यत्यय नाही तुला ?

_ पण मेंदू आहे की

हं

_ एक काम करशील ?

झेपणार असेल तर नक्की करेन

_ स्वत:भोवती एक गिरकी मार

हे काय काम आहे का ?

_ अरे कर तरी

बरं,

स्वत:भोवती गिरकी मारुन पूर्वपदाला येई पर्यंत तो खूप पुढे गेला होता, मी पुन्हा पळत सुटलो त्याच्या मागे. पुन्हा गाठलेच त्याला.

हे बरय तुझं, मला गिरकी मार म्हणाला आणि तू गायब झालास.

_ पुन्हा नुसताच हसला

हसू नको, आता सांग का करायला सांगीतलेस ?

_ हे बघ सोपे गणित आहे. तू स्वत: भोवतीच गिरक्या मारीत बसलास तर मी तुला कधीही सापडणार नाही. माझ्याबरोबर पळायचे असेल तर आधी ते स्वत:भोवती गिरक्या मारणे बंद करावे लागेल.

आणि वाटेत मी दमलो तर नेशील का रे तुझ्यासोबत ?

_ अजिबात नाही, तुलाच नव्या दमाने पळावे लागेल. पुन्हा बरोबरीला येवून धावावे लागेल.

म्हणजे तू थांबून विचारणार सुद्धा नाहीस मी दमलो तर ?

_ ती झाडाखाली आजी दिसतीय का स्वेटर विणत बसलेली ?

हां रे ! मगाचपासून पळतोय आपण पण ते झाड आणि ती म्हातारी नजरेआड व्हायला हवी होती. 

_ हो, आपल्या नजरेआड ती नव्हे, आपण तिच्या नजरे आड होवू शकत नाही.

पण का ? ती स्वेटर का विणतीय ?

_ दोन्हीचेही उत्तर मला नाही माहिती.

खोटं बोलतोयस

_ तसं समज

मी पळता पळता त्या आजीला हात केला, तीचे लख्ख निळे डोळे चमकले. खूप छान हसते ती आजी. दोन्ही हात अलगद उंचावून मला तो अर्धवट विणून झालेला स्वेटर दाखवला. मी खूप छान अशी खूण केली. पुन्हा बघतो तर हा पट्ठ्या लांब गेलेला पळत. मी धडपडलो, कपडे झटकले आणि पुन्हा पळायला लागलो. तशी ती म्हातारी पुन्हा हसली, गूढ हसली. 

अरे थांब ! आलोच मी

_ धडपडलास वाटते ?

तुला पाठीला डोळे आहेत का ?

_ तुला दिसले का माझ्या पाठीवर डोळे ?

च्यायला तू लैच अवघडयस

_ कसा वाटला स्वेटर ?

अरे लहान मुलांचा आहे तो, मला काय उपयोग त्याचा ?

_ ते ही आहेच म्हणा, कळेल वेळ आल्यावर

कधीतरी कळेल अस बोलत जा रे

_ त्यावर नुसताच हसला

हसू नकोस, मी थांबतो जरावेळ, खूप दमायला होतय 

_ बरं थांब, पण लक्षात ठेव हा पुन्हा पळावे लागेल, मी कुणासाठीही थांबत नाही.

आणि माझ्या उत्तराचीही वाट न बघता तो तसाच चालता झाला…

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!